परीक्षार्थींसमोर संकट; प्रशासनाविरोधात संताप

नागपूर : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिका प्रशासनाने निर्बंधाच्या नावाखाली शहरातील अभ्यासिका आणि ग्रंथालये बंद केल्याने ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. पंधरा दिवसांवर आलेल्या परीक्षेची जोमाने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज मंगळवारी अक्षरश: अभ्यासिकांमधून बाहेर काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

करोनामुळे  महापालिकेने अनेक निर्बंध जाहीर केले. त्यानुसार शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. शाळा, महाविद्यालये बंद करताना ग्रंथालये आणि अभ्यासिका बंद करण्याचा कुठलाही उल्लेख महापालिकेच्या आदेशात नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. असे असतानाही महापालिका प्रशासन अभ्यासिका बंद करत आहे.

वर्षभरात चारदा रद्द झालेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अखेर १४ मार्चला होणार आहे.  टाळेबंदीनंतर परीक्षेच्या तारखा जाहीर होताच अभ्यासाने जोर धरला. गावाकडे परत गेलेले विद्यार्थी नागपूर गाठत भाड्याच्या खोलीत राहून अभ्यासिकांमध्ये परीक्षांची तयारी करत आहेत. पंधरा दिवसांवर परीक्षा आल्याने आधीच तणावात असलेल्या विद्यार्थ्यांसमोर आता अभ्याससिका बंद झाल्याने नवे संकट उभे झाले आहे.

भाड्याच्या खोलीमध्ये अनेक विद्यार्थी राहत असल्याने तेथे अभ्यास करणे अशक्य असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठासह अन्य खासगी व अनुदानित ग्रंथालय आणि अभ्यासिकांचा मोठा आधार असतो.  नुकताच विद्यापीठाने २४ तास अभ्यासिका सुरू ठेवण्याचा निर्णयही घेतला. मात्र, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत.

इतर शहरात अभ्यासिका सुरू

करोनाची स्थिती  पुणे आणि मुंबईमध्येही नागपूरप्रमाणेच आहे. असे असतानाही तेथील स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध घालून अभ्यासिका सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पुण्यात अभ्यासिकांमधील उपस्थिती ५० टक्के करण्यात आली. मात्र, नागपूर महापालिकेने कुठलाही विचार न करता सरसकट अभ्यासिकांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविरोधात रोष आहे.

लोकप्रतिनिधींना साकडे

अभ्यासिका सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आमदार मोहन मते यांना निवेदन दिले. परीक्षेच्या तोंडावर महापालिके ने अभ्यासिका बंद के ल्याने प्रचंड नुकसान होत असून ते सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी के ली.