११ पैकी ७ जिल्ह्य़ांत कठोर प्रतिबंध;  कुठे अंशत: तर कुठे पूर्णवेळ व्यवहार ठप्प

टाळेबंदीमुळे लोकांची होणारी गैरसोय आणि उद्योग व्यवसायाचे होणारे कोटय़वधींचे नुकसान याकडे कानाडोळा करून करोना साथ नियंत्रणासाठी आम्ही काहीतरी करतो, हे दाखवण्याच्या हव्यासापोटी स्थानिक प्रशासनाने विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्य़ांत पुन्हा टाळेबंदी लागू केली आहे. काही जिल्ह्य़ात ती अंशत: तर काही जिल्ह्य़ात  पूर्णवेळ आहे. विशेष म्हणजे, टाळेबंदीचे स्वरूप व निकष प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी आहे व मृत्यू नाही तेथेही हा आर्थिकदृष्टय़ा आत्मघातकी प्रयोग केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

विदर्भात एकूण ११ जिल्ह्य़ांपैकी नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे चार जिल्हे सोडले तर इतर आठ जिल्ह्य़ांत  कुठे पूर्णवेळ, कुठे अंशत: टाळेबंदी आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात २१ जुलैपर्यंत, वाशीम जिल्ह्य़ात रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात मंगळवारपासून सात दिवसाची तर चंद्रपूर आणि अकोल्यात अनुक्रमे १७ आणि १८ जुलैपासून तीन दिवसांची टाळेबंदी लागू होणार आहे. वर्धा, अमरावती आणि यवतमाळात अंशत: टाळेबंदी आहे. वर्धा जिल्ह्य़ात आर्वी तालुक्यात आणि शहराचा काही भाग, अमरावती शहरात आठवडा अखेरचे दोन दिवस टाळेबंदी आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात बाजारपेठेची वेळ स. १० ते दुपारी २ पर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे.

टाळेबंदीचे नियम आणि निकष जिल्हानिहाय वेगवेगळे आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात एकही मृत्यू नसताना टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जिल्ह्य़ातील भद्रावती, चिमूर आणि ब्रम्हपुरी येथे टाळेबंदी करण्यात आली होती. वर्धा जिल्ह्य़ात मृत्यूसंख्या फक्त एक असतानाही  टप्प्याटप्प्याने टाळेबंदीचे चक्र सुरूच आहे. संपूर्ण राज्यात  राज्य शासनाने लग्नसमारंभासाठी वऱ्हाडय़ांची संख्या ५० इतकी मर्यादित केली असताना अमरावती जिल्ह्य़ात ती बदलवून प्रशासनाने  २५ वर आणली आहे. यवतमाळात बाजारपेठांची वेळ कमी करून ते स. १० ते दुपारी २ पर्यंत ठेवण्यात आली आहे. इतर ठिकाणी पूर्णवेळ बाजारपेठा सुरू आहेत. विदर्भात सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या नागपुरात (२५०५) आहे. येथे मात्र प्रशासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला नाही. पश्चिम विदर्भातील तीनही जिल्ह्य़ात टाळेबंदीमुळे रुग्णसंख्या रोडावल्याचे दिसून आले नाही. उलट वाढल्याच्या नोंदी आहेत. अशीच परिस्थिती विदर्भातील इतरही जिल्ह्य़ांची आहे.

१४ जुलैपर्यंत विदर्भातील बाधित रुग्णांची एकूण संख्या  ७,६३६ तर मृत्यू संख्या २१८ आहे. सर्वाधिक मृत्यू अकोल्यात (९७) आणि नागपूर (३८) मध्ये आहेत. २,४७७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.५० टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढतेय कारण प्रत्येक जिल्ह्य़ात तपासणीची सोय झाली आहे. जलदगतीने तपासणी अहवाल  देणारे यंत्रही उपलब्ध झाले आहेत, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र दुसरीकडे याचाच आधार घेऊन  पुन्हा टाळेबंदी लादली जात आहे.

रुग्णवाढ आणि टाळेबंदीचा परस्पर संबंध नाही. तपासण्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही जिल्ह्य़ात नियम कठोर करण्यात आले आहे. संपूर्ण टाळेबंदी नव्याने कुठेही लावण्यात आली नाही. लोकांची गैरसोय होऊ नये याची प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

– पीयूष सिंह, विभागीय आयुक्त, अमरावती.

‘‘करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लोकांनी मुखपट्टय़ा आणि शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. वाढती रुग्णसंख्या बघता प्रशासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला तर त्याला पाठिंबा असेल.’’

-नितीन राऊत, पालकमंत्री, नागपूर