नागपुरात एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरकीडे तुकाराम मुंढे आणि नगरसेवक हा वाद चिघळला आहे. महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढेंविरोधात थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. स्मार्ट सिटीमध्ये २० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान यावरुन सामाजिक कार्यकर्त्याअंजली दमानिया यांनी टीका केली असून तुकाराम मुंढे नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय असा आरोप केला आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत काय घाण राजकारण चाललंय नागपुरात? अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “काय घाण राजकारण चाललंय नागपुरात? तुकाराम मुंढेंवर वर आरोप? लाज वाटली पाहिजे या महापौरांना. अतिशय सरळमार्गी आणि तत्ववादी आहेत ते. तुम्हाला ते नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय”.

 

तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी महापौर स्वत: पोलीस स्थानकात हजर होते. स्मार्ट सिटी संदर्भात सहा महिन्यात घेतलेल्या कुठल्याही निर्णयाची माहिती न देण्यावरून महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधला होता. आतापर्यंतचे निर्णय व कामाची कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले होते. स्मार्ट सिटीतील सहा कर्मचाऱ्यांना संचालकांना विश्वासात न घेता आयुक्तांनी सेवामुक्त केले होते. महापौरांनी आयुक्तांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा अर्ध्यावर सोडून निघून गेल्यानंतर महापौर आणि आयुक्त यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.