पोलिसांचा निष्काळजीपणा चव्हाटय़ावर

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी हा अजनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेऊन पोलीस ठाण्यातून पळून गेला. ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली.

दीपांशू विरूळकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ सप्टेंबर २०१९ रोजी अजनी हद्दीत राहणारी एक १५ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेत गेली होती. त्यावेळी दिपांशूने मुलीची आजी मृत झाल्याचे सांगून मुलीचे अपहरण केले. दोन दिवस झाले तरी मुलगी घरी न आल्याने ११ सप्टेंबर रोजी तिच्या आईने अजनी पोलिसात तक्रार केली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

मुलीला घेऊ न दीपांशू गुजरात येथे पळून गेला. काही दिवस गुजरात येथे राहिल्यानंतर ते नाशिक, पुणे, मुंबई येथे राहिले. ६ ऑक्टोबर रोजी दोघेही नागपुरात आले. काल रात्री ते कोराडी मंदिरात दर्शनासाठी गेले असता अजनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांनाही पोलिसांनी ठाण्यात आणले.

दीपांशूला पोलीस कोठडीत डांबून मुलीला तिच्या कुटुंबीयांसह घरी पाठविले. सोमवारी दुपारी तपास अधिकारी सहायक फौजदार डेहनकर यांनी दीपांशूला चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले. त्याची चौकशी सुरू असतानाच दुपारी  लघुशंकेला जातो असे सांगून दीपांशू बाहेर निघाला आणि पळून गेला. बराच वेळ झाला तरी तो न आल्याने त्याचा शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

तीन महिन्यांतील दुसरी घटना

अजनी पोलिस ठाण्यातून आरोपी पळाल्याची ही तीन महिन्यांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी १ ऑगस्ट २०१९ रोजी बलात्कार प्रकरणातील आरोपी निखिल चैतराम नंदनकर ने पळ काढला होता. यावरून अजनी पोलिसांचा कामातील निष्काळजीपणा अधोरेखित होत असून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासमोर अशा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे मोठे आव्हान आहे.