६०४ नवीन बाधित आढळले

नागपूर : सोमवारी पुन्हा १९ करोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले. याशिवाय एकाच दिवशी ६०४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३३४ वर पोहचली आहे. आतापर्यंतच्या बाधितांची एकूण संख्याही ९,३८४ इतकी झाली आहे.

आज मृत पावलेल्या १९ रुग्णांपैकी ११ रुग्णांचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला. यामध्ये जागनाथ बुधवारी येथील  ७३ वर्षीय पुरुष, नंदनवन येथील ६५ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष वाठोडा, ७३ वर्षीय पुरुष मिलिंदनगर, ३५ वर्षीय पुरुष अंबाझरी, ६१ वर्षीय पुरुष टिमकी, ६० वर्षीय पुरुष सिद्धार्थनगर कामठी, ६६ वर्षीय महिला आनंदनगर, ६८ वर्षीय महिला पंचशीलनगर, ६६ वर्षीय पुरुष कमाल चौक, ५५ वर्षीय पुरुष पारडी येथील रहिवासी होते. १९ मृत पावलेल्यांपैकी २ ग्रामीण, १५ शहर तर २ जिल्ह्याबाहेरील आहेत.  नवीन ६०४ नव्या रुग्णांपैकी १५० ग्रामीण तर ४५४ शहरातील आहेत. सोमवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ११३ रुणांचा चाचणी अहवाल मेयोतून सकारात्मक आला. मेडिकलमध्ये १०४ , एम्समध्ये ३४, नीरी २०, माफ्सूच्या प्रयोगशाळेतून १३, अ‍ॅन्टीजन चाचणीत २४५ तर खासगी प्रयोगशाळेतून ७५ रुग्ण सकारात्मक असल्याचे समोर आले. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ४,१८१ रुग्ण उपचार घेत असून ४,८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  दिवसभरात १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून यामध्ये ३३ ग्रामीण तर १४४ शहरातील आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.८९ टक्के आहे.