• फळ, धान्य, आलू-कांदे मार्केट बंद,  भाज्यांचा बाजार दुपारी बारापर्यंतच 
  •   आवक घटल्याने फळ भाज्यांचा तुडवडा  निर्माण होणार, दरही वाढणार

 

नागपूर : धान्य, भाजी, फळांचा अत्यावश्यक सेवेत समावेश असतानाही करोनामुळे फळ व भाज्यांची प्रमुख बाजारपेठ असलेला कळमना बाजार बंद असल्याने पुढच्या काळात भाज्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नागपूरबाहेरून भाजी घेऊन येणारी वाहने पोलीस अडवत असल्याने त्याचाही फटका पुरवठय़ावर झाला आहे. त्यामुळे  दर वाढण्याची शक्यता आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि शहर लॉकडाऊन असतानाही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नेहमीप्रमाणे उघडी राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र पोलीस जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक कारणाऱ्या गाडय़ांना अडवत आहे. सीमा सील केल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. कळमना बाजारात दररोज  एक हजार छोटय़ा मोठय़ा गाडय़ांमधून फळ-भाजी येते. स्थानिक दीडशे छोटय़ा गाडय़ा येतात. कळमना बाजारात अंदाजे ९ हजार कामगार काम करतात. मात्र येथे खरेदीदारांची गर्दी होत असल्याने  आलू कांदा व्यापाऱ्यांनी शनिवापर्यंत बाजरपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय येथे धान्य बाजार आहे. येथे सर्वदूर राज्यातून अनेक गडय़ा धान्य, कडधान्य घेऊन येतात. येथून सर्वत्र त्याचा पुरवठा सर्वदूर विदर्भात केला जातो. मात्र ट्रकचालकांना शहराच्या सीमेवर अडवत असल्याने अनेक वाहन परत जात आहे. एकीकडे प्रशासन जीवनावश्यक वस्तूंवर बंदी नसल्याने सांगत असल्याने दुसरीकडे मात्र पोलीस अतिशयोक्ती करताहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे.

फळ बाजारपेठही बंद

कळमना फळबाजार असोसिएशननेही ३१ मार्चपर्यंत फळबाजार बंद ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे. एपीएमसीत  इतर राज्यातून मोठय़ा प्रमाणात फळांची आवक होते. त्यामुळे येथे हजारो कामगार एकत्र काम करतात. अशात करोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. अशात खबदारी म्हणून फळबाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याचा थेट फटका शेकऱ्यांना, उत्पादकांना, व्यापाऱ्यांना, जडवाहतूकदारांना, अडतिया आणि कामगारांना होणार आहे. बंदीमुळे कोटय़वधींचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्याशिवाय काही राज्यातील सीमा देखील सील केल्याने फळांची आवकही कमी होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पुढील दोन दिवसात फळांचा तुटवडा निर्माण होणार असून दरही अधिक वाढणार आहेत.

लॉकडाऊनचा गैरफायदा

ठोक बाजारात भाज्यांचे भाव थोडे वाढलेले आहेत मात्र किरकोळ विक्रेते लॉकडाऊनचा फायदा घेत भाज्या अधिक दरांनी विकत आहेत. नागरिकांना फिरण्यास मज्जाव केला असल्याने मिळेल त्या ठिकाणावरून फळ भाज्या विकत घेत आहे. याचा फायद घेत किरकोळ विक्रेते जादा दराने भाज्या विकत आहेत.

कॉटन मार्केटमध्येही आवक घटली

शहरातील नागरिक ताजे फळ भाज्या घेण्यासाठी कॉटन मार्केट येथील बाजारात जातात. तेथे स्थानिक शेतकरी मोठय़ा संख्येने भाज्या आणतात. मात्र येथे गर्दी होत असल्याने आवक घटली आहे. व्यापारी शेतकऱ्यांकडून माल घेऊन थेट ग्राहक किंवा किरकोळ विक्रेत्याला देत आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक येथे पोहचू शकत नसल्याने व्यापाऱ्यांनी मोजकाच माल खरेदी करणे सुरू केले आहे. भाज्यांचे दर आटोक्यात असले तरी मात्र किरकोळ विक्रेते संधीचा फायदा घेत दर वाढवून भाज्या विकत आहेत.

कळमन्यात प्रशासनाचे दुर्लक्ष

कळमना बाजारात जवळपास ९ हजार कमागार काम करतात. येथे हजार छोटय़ा मोठय़ा गाडय़ा इतर राज्यातून येतात. त्यामुळे येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता होणे अपेक्षित आहे. मात्र येथे सर्वत्र घाण पसरली असून पिण्याचे पाणी देखील कामगारांना मिळत नाही. त्यामुळे येथे कामगार जीव धोक्यात टाकून काम कराहेत. अशात प्रशासनाकडून फवारणी आणि मूलभूत सोयी होणे अपेक्षित असताना सर्वाना वाऱ्यावर सोडले आहे.

– राजेश छाबरानी, माजी अध्यक्ष एपीएमसी