एरवी एखाद्या चित्रपटात किंवा नाटकाच्या रंगमंचावर बघावयास मिळणारी घटना शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनेकांना अनुभवायला मिळाली. एक ७० वर्षांची वृद्ध महिलान्याय मागण्यासाठी  थेट न्यायकक्षात बसलेल्या न्यायमूर्तीसमोर पोहोचली. तिने न्यायमूर्तीना साद घातल्यानंतर न्यायालयानेही महिलेची तक्रार ऐकून उच्च न्यायालयाच्या निबंधकांना योग्य कारवाईचे आदेश दिले.

मीराबाई पुरांडकर असे वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या १६ वर्षांच्या असताना १९६० मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती शिक्षक होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. विवाहानंतर पती दररोज त्यांना शिविगाळ करून मारहाण करायचा. या जाचाला त्या कंटाळल्या होत्या. मारहाण केल्यानंतर तो त्यांना घरातून हाकलून लावायचा. अनेकदा पतीने त्यांना माहेरी पाठवले. माहेरची मंडळी पुन्हा संसार करण्यासाठी पाठवायचे. त्याच्याकडे राहिल्यानंतर तो पुन्हा मारहाण करायचा. यातून मार्ग काढायचा म्हणून पतीच्या घरापासून २ ते ३ किमी अंतरावर राहणाऱ्या सासू सासऱ्यांकडे त्या राहू लागल्या. दरम्यान, पती तेथेही येऊन त्यांना मारहाण करीत होता. दररोजाच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळली असता १९८४ मध्ये  पतीने घटस्फोटाकरिता अर्ज केला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुलेही हिसकावण्यात आली. अद्यापही त्यांचा घटस्फोट झालेला नाही. १९९० मध्ये त्यांचा मुलगा त्यांच्याकडे राहण्यासाठी परतला. तो सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे पतीकडून पोटगी मिळण्यासाठी बुलडाणा न्यायालयात अर्ज केला आहे. पण, अद्याप पोटगी मिळत नसून आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा महिलेने केला आहे. इतक्या वर्षांच्या न्यायालयीन लढयाला यश यत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून महिला थेट उच्च न्यायालयात दाखल झाली. महिलेने न्या. रवि देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांचे न्यायकक्ष गाठले. न्यायालयात केवळ वकिलांना बाजू मांडता येते. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता अतिशय महत्त्वाच्या विषयावर सुनावणी सुरू असताना अचानक एका हातामध्ये गाठोडे व दुसऱ्या हाती कागद घेऊन कमरेतून वाकलेल्या अवस्थेत मीराबाई आतमध्ये शिरल्या. त्या न्यायमूर्तीच्या दिशेने जात असल्याने वकिलांनी वाट मोकळी करून दिली. न्यायमूर्तीनाही काहीसे आश्चर्य वाटले. सर्वाचे लक्ष त्यांच्यावर खिळले होते. त्यांनी एक कागद न्यायमूर्तीना देण्याचा प्रयत्न केला.

न्यायमंचाची उंची बरीच असल्याने न्यायमूर्तीच्या टंकलेखकाने कागद न्यायमूर्तीकडे दिला. न्यायमूर्तीनी कागद वाचला व मराठीतून त्यांच्याशी संवाद केला. यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. न्यायमूर्तीनी ताबडतोब निबंधक अतुल शहा यांना बोलावून घेतले व महिलेच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. निबंधकांनी बुलडाणा जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिवांशी समन्वय साधून प्रकरण निकाली लावण्यास सांगितले व त्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. या घडामोडीनंतर मीराबाई पुन्हा परतीच्या मार्गाला लागल्या.