|| देवेश गोंडाणे

वीस दिवसांनंतरही डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारला नाही

नागपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ‘आयआयटी’चे डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची वीस दिवसांपूर्वी निवड होऊनही त्यांनी अद्याप पदभार न स्वीकारल्याने शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिवाय डॉ. शर्मा यांना केवळ अडीच वर्षेच कुलगुरू पदावर राहता येणार आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले तर सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासनपद धारण करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची २३ मार्चला निवड केली. त्यानंतर कुलगुरूंनी दोन ते तीन दिवसांत पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, नियुक्ती आदेशाला वीस दिवस उलटूनही डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारलेला नाही. विद्यापीठ कायद्यात नियुक्तीनंतर किती दिवसांमध्ये पदभार स्वीकारायला हवा असा कुठलाही उल्लेख नाही. मात्र, बहुतांश नियुक्ती आदेशामध्ये पदभार कधीपर्यंत स्वीकारावा याच्या सूचना दिलेल्या असतात. मात्र, डॉ. शर्मा यांच्या नियुक्तीपत्रामध्ये तसा कुठलाही उल्लेख नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोंडवाना विद्यापीठाचा प्रभार हा संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे आहे. डॉ. वरखेडी यांनी स्वत: संपर्क साधून डॉ. शर्मा यांना पदभार स्वीकारण्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी काही वैयक्तिक कारणास्तव विलंब होत असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.

अडीच वर्षांसाठी नियुक्ती का?

विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीने अधिकारपद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांचा अवधी किंवा तिच्या वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंतचा अवधी या दोन्हीपैकी जो कोणताही अवधी अगोदर पूर्ण होईपर्यंत पदावर राहता येईल. यानुसार डॉ. शर्मा यांचे सध्याचे वय हे ६२ वर्षे काही महिने आहे. त्यामुळे त्यांना केवळ अडीच वर्षेच पदावर राहता येणार आहे. विशेष म्हणजे, कुलगुरू निवडीची प्रक्रिया फार मोठी असल्याने किमान चार ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचीच कुलगुरुपदी नियुक्ती केली जाते. मात्र, डॉ. शर्मा यांची अडीच वर्षांसाठीच नियुक्ती करण्यात आल्यानेही याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

आयआयटीतून पदमुक्तीची प्रक्रिया सुरू

दिल्ली आयआयटीमधून डॉ. शर्मा यांना पदमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आठवड्यात सर्व कागदपत्रांची पूर्तता होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून कळवण्यात आली.