एम.बी.ए. आणि एम.कॉम. समकक्ष असल्याचा दावा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन शास्त्र आणि वाणिज्य अभ्यासक्रम समकक्ष असल्याचा दाखला देत नियमबारित्या प्राचार्याच्या नियुक्त्या केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या नियुक्त्यांना उच्च शिक्षण सहसंचालक आणि विद्यापीठाकडूनही मान्यता दिली जात असल्याने या प्रकाराला विरोध होत आहे.

माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या कार्यकाळात व्यवस्थापन शास्त्राच्या प्राध्यापकांची नियुक्ती वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी करण्याची घोडचूक करण्यात आली होती. यासाठी डॉ. काणे यांनी डॉ. श्रीकांत कोमावर यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करून या नियुक्त्यांना मान्यता दिली होती. त्यानंतर हा गंभीर प्रकार विद्वत परिषदेसमोर  आला होता. विद्वत परिषदेद्वारे एम.बी.ए. आणि  एम.कॉम. या दोन्ही पदव्या समकक्ष नसल्याचा निर्वाळा २०१९ साली देण्यात आला होता. त्याबाबत ठराव मांडण्यात आला होता.

या ठरावाला अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात आले होते. त्यावेळी वाणिज्य अभ्यासमंडळाने  एम.बी.ए. आणि एम.कॉम. समकक्ष नसल्याचा निर्वाळा दिला होता. असे असतानाही विद्यापीठाकडून पुन्हा  समकक्ष पदव्या असल्याचा दाखला देत जुनाच कित्ता गिरवला जात आहे. उदाहरणार्थ  स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात २७ एप्रिल २०१७ साली प्राचार्य पदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने डॉ. संजय चरलवार,

डॉ. एस.नायर, डॉ. दिलीप गोतमारे, डॉ. जीवन दोंतुलवार, डॉ. संजय धनवटे, डॉ. एन.आर. दीक्षित, शासनाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. मिलिंद बारहाते यांचा समितीने डॉ. अजित शृंगारपुरे यांची निवड केली. त्यानंतरही विद्यापीठाद्वारे एम.बी.ए. असलेल्या प्राध्यापकांना वाणिज्य महाविद्यालयांत नियुक्त्या दिल्याची बाब समोर

आली होती. त्यामुळे वाणिज्य प्राध्यापकांमध्ये रोष आहे. त्यातूनच अशा प्राचार्याची निवड रद्द करण्याची मागणी समोर येत आहे.

आधीचा निर्णय असा..

डॉ. अजित शृंगारपुरे यांच्या निवडीनंतर यासंदर्भात उपकुलसचिव डॉ. रमण मदने यांनी  नियुक्ती देता येत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले होते.  यावर तत्कालीन कुलगुरूंनी  समितीची स्थापना केली. या समितीने डॉ. शृंगारपुरे यांच्या नियुक्तीला मान्यता देता येणे शक्य असल्याचा अहवाल दिला व यानंतर हा नियम कुणालाही लागू करता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते.

सहसंचालकांकडूनही अभय

प्राचार्याची नियुक्ती ही शैक्षणिकदृष्टय़ा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक निवड समितीमध्ये उच्च शिक्षण सहसंचालकांची महत्त्वाची भूमिका असते. सहसंचालकांनी शैक्षणिक अर्हता, समकक्ष अभ्यासक्रम तपासून या नियुक्त्यांना मान्यता द्यायची असते. मात्र, सहसंचालकांकडूनही अनेकदा अशा नियुक्त्यांना अभय दिले जात असल्याने ‘नुटा’ने यासंदर्भात सहसंचालकांसह विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देत नियमाब नियुक्त्यांना विरोध दर्शवला आहे.

एम.बी.ए. हा अभ्यासक्रम एआयसीटीईच्या अंतर्गत येतो. त्यामुळे एम.बी.ए. आणि एम.कॉम. समकक्ष होऊच शकत नाही. असे असतानाही एमबीएच्या शिक्षकांना एम.कॉम.ला निवडणे चुकीचे आहे.

– डॉ. नितीन कोंगरे, उपाध्यक्ष, ‘नुटा’