सव्वातेरा लाख कर्मचारी असलेल्या रेल्वेला आता तिकीट विक्रीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात रस नाही. रेल्वेने अनारक्षित तिकीट विक्रीकरिता कमिशनवर तिकीट बुकिंग सेवक नियुक्त करण्याचे धोरण स्वीकारले आहे. नागपूर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकावर लवकरच बुकिंग सेवक नियुक्त केले जाणार आहे.

रेल्वेची आर्थिक स्थिती नाजूक असून ती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, रेल्वेच्या जमिनी भाडेपट्टीवर देणे तसेच साईिडग खासगी लोकांना देणे आदी उपायांचा समावेश आहे. कार्यरत कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च परवडत नसल्याचे सांगत रेल्वेच्या अनेक सेवांचे अप्रत्यक्ष खासगीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून साधारण तिकीट विक्रीसाठी बुकिंग सेवक नियुक्त करण्यात येत आहेत. रेल्वेने प्रवाशांची सुविधा आणि बेरोजगारांना रोजगार असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून रेल्वे हा प्रयोग करीत आहे.

बुकिंग सेवक होण्यासाठी विशिष्ट रक्कम रेल्वेकडे जमा करावी लागते. त्यानंतर या सेवकांना प्रत्येक तिकीटमागे एक रुपया कमिशन मिळते. तिकीट बुकिंग सेवकामार्फत प्लेटफार्म तिकीट विक्री, महिन्याच्या पासचे नूतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून दिली जाते.

नागपूर विभागातील सर्व रेल्वेस्थानकावर जनसाधारण तिकीट बुकिंग सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुकांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील वाणिज्य विभागात संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.