अपूर्व विज्ञान मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेगळी अनुभूती, प्रयोगाची संधी, ध्येयनिश्चितीचा मार्ग आणि म्हणूनच त्यासाठी ही चिमुकले विद्यार्थी सातत्याने धडपडत असतात. त्यातही महापालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी क्वचितच मिळते, पण आता त्याच विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रयोग राज्यस्तरावर पोहोचले आहेत. गेल्या २५-३० वषार्ंपासून नागपुरातील महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा अपूर्व मेळावा आता राज्यभर राबवण्यात येणार आहे.

गेल्या तीन दशकांपासून अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून महापालिकेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाच्या प्रयोगांमधील चुणूक शहरातील नागरिक बघत आहेत. विज्ञान विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सहज म्हणून या मेळाव्याला भेट दिली आणि अपूर्व विज्ञान मेळावा त्यांच्या नजरेत भरला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुंपासून तयार केलेले विज्ञान मॉडेल्स आणि प्रयोग अभिनव असल्यामुळे त्यांनी राज्यात ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ३६१ तालुका आणि २६ महापालिकामध्ये असे एकूण ३८७ मेळावे अपूर्व विज्ञान मेळावे आता आयोजित केले जाणार आहेत. त्यादृष्टीने पूर्वतयारी म्हणून विज्ञान शिक्षकांसाठी नागपुरात दोन दिवसांची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून यात २०० नागरिक मेळावा पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठीसहभागी झाले आहेत. मेळाव्यातील प्रयोगाच्या सीडी आणि पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत आणि शिक्षकांना त्या देण्यात आल्या आहेत. सीडी आणि पुस्तकांचा संच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकाला भेट देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात तीन चमू तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक व जिल्ह्यातील उत्साही, उपक्रमशिल विज्ञान शिक्षक यांचा समावेश आहे. राज्यातल्या ३७ जिल्ह्यात या चमूवर आयोजनाची जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला विभाग स्तरावर विज्ञान सल्लागार असणार आहेत. राज्यातील आठ शैक्षणिक विभागातील आठ विज्ञान सल्लागार या प्रशिक्षणासाठी आले आहेत. त्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाला मेळाव्याचे रूप दिले. नागपूर महापालिकेचे १२५ विद्यार्थी व ५० शिक्षक यात सहभागी झाले. प्रयोगाचे तत्त्व आणि चर्चादेखील याठिकाणी होणार आहे. राज्य विज्ञान संस्थेने स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी पारितोषिकेसुद्धा ठेवली आहेत, अशी माहिती संचालक नारायण जोशी यांनी दिली. राष्ट्रभाषा भवनचे सुरेश अग्रवाल या सर्व उपक्रमात सहभागी आहेत. २८ फेब्रुवारीला आयोजित विज्ञान दिनानिमित्त राज्यात ४०० ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक, १२५ खिळे लावलेली पाटी व त्यावर बसणे, पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन, हवेत २० टक्के ऑक्सिजन आहे हे दर्शविणारे असे ६०० ते ७०० प्रयोग या सीडीत आहे. हे सर्व प्रयोग बालटी, पाणी, सुई, धागा, बिसलेरी बॉटल, चहाचे प्लॅस्टिकचे कप अशा टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून हे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगाची कारणमिमांसासुद्धा आहे.