वकिलाला घरात घुसून लुटले; अनेक वाहनांची तोडफोड

नागपूर : सशस्त्र गुंडांनी रविवारी लष्करीबागेत रात्रभर धुमाकूळ घातला. अनेक वाहनांची तोडफोड केली व लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एका वकिलाला घरात घुसून लुटले. पाचपावली पोलिसांनी या गुंडांच्या १२ तासांच्या आत मुसक्या आवळल्या.

सौरभ सुधीर वासनिक (२४), अलक्षित राजेश अंबादे (१९), राहुल राजू जारुंडे (२८), रोहन शंकर बिहाडे (२२) आणि अमित ऊर्फ उद्दू कृष्णा गजभिये (१९) सर्व रा. लष्करीबाग अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. वीरेंद्र ऊर्फ बाबू बकरी, हुक्या बिहाडे आणि त्यांचे ५ ते ६ साथीदार अद्याप फरार आहेत. आरोपींविरुद्ध  अनेक गुन्हे दाखल आहेत. रविवारी रात्री आरोपी  मद्यधुंद अवस्थेत हातामध्ये तलवार, चाकू घेऊन लष्करीबाग परिसरात फिरत होते. लोकांना तलवारीचा धाक दाखवत होते. यावेळी त्यांनी जवळपास ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर लष्करीबाग निवासी वकील मनोज  वासनिक (४५) यांच्या गळ्यावर तलवार लटकवून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील भिंतीची तोडफोड केली व कपाटातील २ हजार ५०० रुपये लुटून नेले. मनोज यांच्या तक्रारीवर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, सहाय्यक निरीक्षक सूरज सुरोशे, राजकुमार शर्मा, प्रेमदास वध्रे, विजय यादव, राजेश देशमुख, सारीपुत्र फुलझेले, विजय जाणे, रवि मिश्रा, विशाल साखरे, राकेश तिवारी, जितेंद्र खरपुरिया, महेश जाधव, विनोद गायकवाड, विश्वास वालदे, दिनेश शुक्ला, सचिन भिमटे, चेतन गेडाम, जितेंद्र शर्मा यांनी १२ तासांच्या आत गुंडांच्या मुसक्या आवळून त्यांना अटक केली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.