सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना लष्करी कायद्याचे प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील एकमेव लष्कर विधि संस्था या वर्षीपासून कनिष्ठ लष्करी अधिकारी (जेसीओ) तसेच नॉन कमिशन्ड ऑफिसर (एनसीओ) यांनाही कायद्याचे धडे देणार आहे.
कामठी छावणी येथील लष्कर विधि संस्था देश-विदेशातील लष्करी अधिकाऱ्यांना लष्करी कायद्याचे प्रशिक्षण देते. लष्कर सेवेतील सैनिक, अधिकाऱ्यांनी शिस्तभंग किंवा इतर कुठल्याही प्रकारचा गुन्हा केल्यास त्याला लष्करी कायद्यानुसार शिक्षा केली जाते. परंतु संबंधित अधिकाऱ्यावर करावयाची कारवाई कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहण्याची जबाबदारी विविध स्तरावरील अधिकाऱ्यांची असते. त्यांना विधि शाखा अधिकारी मदत करीत असतात. प्रकरण तयार करणे, त्यासंबंधातील फाईल तयार करण्यासाठी विविध स्तरावरील अधिकाऱ्यांना लष्करी कायद्याचे ज्ञान असावे. या हेतूने यावर्षी जुलै महिन्यापासून ‘ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर’ आणि नॉन कमिशन्ड ऑफिसर यांना लष्करी कायद्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात बोलताना या संस्थेतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, जेसीओ आणि एनसीओ यांच्यासाठी पथदर्शी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. जुलैपासून प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.
कामठी ही संस्था गेल्या २६ वर्षांपासून लष्करी कायद्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. सेवेतील अधिकाऱ्यांना लष्करी कायद्याचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये लष्कर, निमलष्कर दलातील कर्नल श्रेणीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. सैन्यदल, नौदल, हवाई दल आणि निमलष्करात मोडणाऱ्या बीएसएफ, कोस्ट गार्ड, जीआरईएफचे अधिकारी येथे प्रशिक्षणासाठी येतात.
कामठीतील ही संस्था लष्करी कायद्याचे सविस्तर अभ्यासक्रम चालविणारी आशिया खंडातील एकमेव संस्था असल्याने आशिया खंडातील विविध देशातील लष्कर अधिकारी येथे प्रशिक्षणासाठी येतात. आफ्रिकेतील लष्कर अधिकारी देखील येत असतात. याशिवाय विविध देशातील लष्करी शिष्टमंडळ येथे भेट देतात. गेल्या वर्षी इजिप्तचे शिष्टमंडळ आले होते. त्यापूर्वी अमेरिकेच्या सीमा सुरक्षा दलातील महिला अधिकारी प्रगत अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता आल्या होत्या. तसेच बांगला देशातील अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत. लष्कर विधि संस्थेत सध्या चार प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. यामध्ये मध्यमस्तरावरील अधिकारी अभ्यासक्रम, तज्ज्ञ अधिकारी अभ्यासक्रम किमान १० वर्षे सेवा झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना करता येतो. जज अ‍ॅडव्होकेट अ‍ॅडव्हान्स कोर्स आणि जज अ‍ॅडव्होकेट बेसिक कोर्स हे दोन अभ्यासक्रम केवळ विधि शाखा अधिकारी आणि कर्नल श्रेणी असलेल्या अधिकाऱ्यांना करता येतात.
संस्थेचा सन्मान
संरक्षण मंत्रालयाने १९८५ मध्ये विधि संस्था स्थापन्याला मंजुरी दिली. प्रारंभी दिल्लीतील सैन्यदल मुख्यालयात या संस्थेचे कार्य चालत होते. तीन वर्षांनंतर ही संस्था शिमला येथे स्थानांतरित करण्यात आली. त्यानंतर ही संस्था १९८९ ला कामठी छावणी येथे कायमस्वरूपी स्थानांतरित करण्यात आली. मेजर जनरल ए.बी. गोरथी यांच्या हस्ते १६ मे १९९० ला औपचारिक उद्घाटन झाले. गेल्या वर्षी या संस्थेने रौप्य महोत्सव साजरा केला.

‘लष्कर विधि संस्थेत आतापर्यंत विधि शाखेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये विदेशातील अधिकारी देखील प्रशिक्षणासाठी सहभागी होतात. लष्करी कायद्याचे प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील एकमेव संस्था आहे. या संस्थेने आणखी पाऊल पुढे टाकत ‘जेसीओ’ आणि ‘एनसीओ’ यांना कायद्याचे ज्ञान देण्याचे ठरवले आहे. त्याचा लाभ काम करताना, फाईल्स तयार करताना होईल’
– विंग कमांडर समीर गंगाखेडकर, जनसंपर्क अधिकारी, संरक्षण मंत्रालय.