News Flash

लोकजागर : ‘दीपाली’च्या निमित्ताने..

अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रातील कनिष्ठांना नेमके कसे प्रशिक्षण द्यावे यासाठी परदेशवारीची संधी सुद्धा मिळते.

देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

मेळघाटमधील वनाधिकारी दीपाली चव्हाणने आत्महत्या करायला नको होती. ती जर ‘लेडी सिंघम’ होती तर तिने अन्यायाविरुद्ध लढायला हवे होते अशी प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करतात. याची नेमकी मीमांसा करणे अवघड आहे. कारण हा टोकाचा निर्णय घेताना दीपालीची मानसिक अवस्था नेमकी कशी होती याचा अंदाज बांधणे अशक्य. या मृत्यूच्या निमित्ताने वनखात्यात महिलांचे होणारे शोषण, अधिकाऱ्यांमधील सरंजामी वृत्ती, राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना कस्पटासमान लेखणे यासारख्या अनेक पैलूंवर बरीच चर्चा झाली. एक मुद्दा मात्र दुर्लक्षित राहिला. राज्यसेवेतून वनखात्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा. दीपालीच्या या टोकाच्या पावलामागे विद्यमान प्रशिक्षण व्यवस्थेचे अपयश सुद्धा दडलेले आहे. कोणत्याही सरकारी खात्यात नोकरी करण्याआधी प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक असतोच. पोलीस व वनखात्यात याचा कालावधी दीर्घ असतो. तो पूर्ण केल्यावरच नियुक्ती मिळते. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस दलात अजूनही याचे महत्त्व टिकून आहे. जंगलाची व पर्यायाने त्यात राहणाऱ्या माणूस व वन्यप्राण्यांची जबाबदारी असलेल्या वनखात्यात याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. या खात्यात येणाऱ्या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण थोडे तरी बरे असते, पण राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होते. हे प्रशिक्षण योग्य, पद्धतशीर असते तर कदाचित दीपालीने हे कृत्य केले नसते असे मानण्यास बराच वाव आहे.

राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका बव्हंशी कार्यक्षेत्रात होतात. त्यामुळे जंगल व वन्यजीवांना भेडसावणाऱ्या समस्यांना सर्वप्रथम त्यांनाच सामोरे जावे लागते. अशावेळी तो अधिकारी तेवढाच प्रशिक्षित व तत्पर असायला हवा. अनेकदा काम करताना या अधिकाऱ्यांना एकीकडे वरिष्ठ व दुसरीकडे जनता अशा कात्रीत सापडावे लागते. दीपाली नेमकी याच अडचणीत सापडली होती. अशावेळी आवश्यक असलेला कणखरतेचा गुण प्रशिक्षणातून येतो. कार्यक्षेत्रात काम करताना सामाजिक भान, ताणतणावावर नियंत्रणाची खूप गरज असते. राज्यातील अधिकाऱ्यांना हे सारे शिकवलेच जात नाही. वनखात्याच्या अखत्यारित राज्यात सहा प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यातील कुंडल व चंद्रपूरची केंद्रे देखणी व सुसज्ज म्हणावी अशीच आहेत. या सर्व ठिकाणी नेमके काय होते तर प्रशिक्षण सोडून सर्वकाही. जंगल व वन्याप्राण्यांशी संबंधित कायद्यांचा अभ्यास म्हणजे प्रशिक्षण असे साचेबद्ध रूप या केंद्रांना अलीकडच्या काही दशकात आले आहे. याला सर्वस्वी जबाबदार भारतीय वनसेवेतील अधिकारी व राज्यकर्ते आहेत. या खात्यात नेमणुकीचा प्राधान्यक्रम लक्षात घेतला तर ही प्रशिक्षण केंद्रे व त्यावर नियंत्रण ठेवणारा संशोधन व शिक्षण विभाग शेवटच्या क्रमांकावर येतो. जे निलंबित झाले आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, जे राज्यसेवेतून पदोन्नत होत वर गेले आहेत, जे अतिशय कामचुकार आहेत किंवा ज्यांना कौटुंबिक कारणासाठी पुणे हवे आहे अशांची नेमणूक या विभागाचा प्रमुख म्हणून होते. आताही दीपाली प्रकरणात आरोपाच्या भोवऱ्यात अडकलेले श्रीनिवास रेड्डी निलंबनातून मुक्त होताच या पदावर गेले तर कुणाला आश्चर्य वाटायला नको. कलंकित माणसेच जर प्रशिक्षणाचे प्रमुख म्हणून नेमली जातील तर तेथील शिक्षणाचा दर्जा काय असणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

तशीच अवस्था प्रशिक्षण केंद्रांच्या प्रमुखांची. येथे नेमणुकीच्या पात्रतेत आणखी दोन निकषांची भर पडते. ज्याच्याजवळ वशिला नाही असे व जे निवृत्तीजवळ आले आहेत ते. म्हणजे एकूणच कुणाला काम करण्यात रस नाही अशा लोकांच्या हाती या विभागाची सूत्रे असतात. यावरून येथील प्रशिक्षणाचा दर्जा काय असेल याची कल्पना सहज करता येते. याशिवाय हा विभाग आर्थिक मुद्यावर वनखात्यात कायम दुर्लक्षिला जातो. या केंद्रांना कायम निधीची चणचण असते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहायला जागा नसते. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना वनकायद्यांच्या बाहेरचे काही शिकवावे, त्यासाठी  त्या त्या विषयातले तज्ज्ञ बोलवावे म्हटले तरी ते अंमलात आणता येत नाही. राज्याने २०११ साली वनप्रशिक्षण धोरण तयार केले. गेल्या दहा वर्षांत या खात्यासमोरचे प्राधान्यक्रम पूर्ण बदलले. अनेक प्रश्नांनी उग्ररूप धारण केले. तरीही या धोरणात बदल करावा असे या खात्यातील एकालाही वाटत नाही. जंगलात राहणाऱ्या समूहांना हाताळणे, गर्दीचे व्यवस्थापन, मानव वन्यजीव संघर्षांतून निर्माण होणारे प्रश्न, त्याची सोडवणूक याविषयी या प्रशिक्षणात काहीही शिकवले जात नाही. वरिष्ठांशी कसे वागावे, त्यांच्याकडून मर्यादाभंग होत असेल तर काय करावे, नियमभंगाचा प्रकार लक्षात आला तर कोणती कृती करावी हे मुद्दे आजकाल सर्वत्र प्रशिक्षणाचा भाग झालेत. हे खाते मात्र त्याला अपवाद. या खात्यावर नियंत्रण ठेवून असणाऱ्या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना मात्र या सर्व गोष्टी अंतर्भूत असलेले प्रशिक्षण दिले जाते. शिवाय नोकरीच्या काळात सुद्धा ते नियमितपणे प्रशिक्षण घेतच असतात. उद्देश हाच की त्यांनी स्वत: प्रशिक्षित व्हावे व हाताखालच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. दुर्दैवाने हेही घडत नाही.

या सेवेतल्या अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रातील कनिष्ठांना नेमके कसे प्रशिक्षण द्यावे यासाठी परदेशवारीची संधी सुद्धा मिळते. गेल्या दहा वर्षांत बारा अधिकारी या संधीचा लाभ घेऊन परदेश फिरून आले. त्यानंतर या सर्वाची नेमणूक किमान एकदा तरी प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख म्हणून व्हायला हवी होती. तसे झाले नाही. सर्वाना परदेशवारीत रस, प्रशिक्षणाचा लाभ इतरांना पोहचवण्यात नाही. अशा स्थितीत दमदार व खमके अधिकारी तयार तरी कसे होणार? देशातल्या अनेक राज्यांनी तेथील वन अकादमी वा प्रशिक्षण केंद्रांना विद्यापीठाशी जोडले. शेजारच्या तेलंगणाने तर वनमहाविद्यालयच सुरू केले. येथे सुद्धा चंद्रपूरच्या अकादमीला विद्यापीठात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, वनखात्यातील अधिकाऱ्यांनी तो उधळून लावला. शिक्षण हा आपला प्राधान्यक्रम नाही असे त्यांचे म्हणणे. उलट दर्जेदार वनशिक्षणातूनच चांगले अधिकारी सेवेत आणले जाऊ शकतात हे वास्तव यांच्या गावीही नाही. प्रशिक्षणाच्या अशा ठिसूळ पायावर तयार होणाऱ्या व कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यकठोरतेची, ताणतणाव सहन करण्याची अपेक्षा तरी कशी बाळगायची? म्हणूनच दीपालीने असे का केले असे प्रश्न गैरलागू ठरतात. ती जर योग्य पद्धतीने प्रशिक्षित असती तर कदाचित वेगळे चित्र असते. या प्रकरणात आपला एक अधिकारी तुरुंगात सडत आहे हे बघून हळहळणारे भारतीय वनसेवेतील अधिकारी आतातरी बोध घेऊन हा कच्चा पाया पक्का करतील का? नुसत्या शिक्षणाने नोकरी मिळवून मनोवृत्तीत काहीच फरक पडत नाही हे शिवकुमारने दाखवून दिल्याने आतातरी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 12:10 am

Web Title: article on forest officer dipali chavan suicide zws 70
Next Stories
1 लसीकरण केंद्रात शारीरिक अंतर नियमांचा फज्जा!
2 ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर’चाही तुटवडा
3 मृत्यूसंख्येने पुन्हा शतक ओलांडले!
Just Now!
X