शैक्षणिक संस्था आणि मंगल कार्यालयाची मोठी संख्या असलेल्या प्रभागात कचरा, पाणी आणि डांबरी रस्ते उखडणे आदी समस्यांबद्दल नागरिकांच्या तक्रारी अधिक असल्याचे दिसून येते.

नवीन प्रभागानुसार तीन वेगवेगळ्या प्रभागातील काही भाग मिळून प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश विकसित असलेल्या या प्रभागात हसनबागमध्ये अजूनही विकास होण्याची आवश्यकता आहे.

या प्रभागात नियमित कचरा उचलण्यात येत नाही. तसेच इतर भागातील कचरा या प्रभागात गोळा केला जात असल्याने लोकांना दरुगधी आणि डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंर्तगत नळावरील मीटर बदलण्यात आले. पाण्याचे नवीन दर आखण्यात आले, परंतु केवळ दोन तास पाणीपुरवठा केला जातो. हवेने मीटर फिरत असल्याची तक्रार येथील नागरिकांची आहे. कबीरनगरातील नागपूर सुधार प्रन्यासच्या उद्यानात नीटनेटकपणा नाही. तक्रारी केल्यानंतरही खेळाचे साहित्य आणि जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करण्यात आलेले नाही.

माजी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या निधीतून गुरुदेवनगर ते रमना मारोती मंदिपर्यंत डांबरीकरण करण्याचे निश्चित झाले होते, परंतु सिमेंटचा रस्ता तयार करायचा आहे म्हणून त्याची निविदा रद्द करण्यास सांगण्यात आले. रस्त्याची वाईट अवस्था असल्याने गेल्या सहा वर्षांपासून लोकांना त्रास आहे. आता कुठे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, असेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विद्यमान नगरसेवकांकडे नागरिक तक्रारी घेऊन गेले असता, कोणत्या भागात राहता, अशी विचारणा करून नगरसेवक तक्रारीची दखल घेत नाहीत. गुरुदेवनगरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या भागात पावसाळ्यातही पिण्याचे पाणी अत्यल्प मिळते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रभागाला डम्पिंग यार्ड केले

नियमितपणे कचरा उचलला जात नाही. महापालिकेने या प्रभागाची डम्पिंग यार्डसारखी अवस्था करून ठेवली आहे. रमना मारोती प्रवेशद्वाराजवळ कचरा जमा करण्यात येतो. तसेच शीतलामाता मंदिराजवळ आणि मिरे लेआऊटमध्ये आजूबाजूच्या परिसरातून कचरा या भागात आणला जातो आणि येथून मग पुढे नेण्यात येतो. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कबीरनगर येथील उद्यानातील खेळणी आणि इतर सुविधेसाठी आंदोलन केले. परंतु येथे जॉगिंग ट्रॅकसह कोणतेही विकासाचे काम झालेले नाही. – नीलेश खोरगडे, मागील निवडणुकीतील पराभूत उमेदवार

कचरागाडी एकदिवसाआड

एकदिवसाआड कचरागाडी येते. त्यामुळे घरातील कचरा कचरापेटीत साठवून ठेवावा लागतो. अनेकदा गाडी येण्यास विलंब होत असल्याने शीतला माता मंदिराकडून हसनबाग चौकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या कडेला मिरे लेआऊटमध्ये कचरा टाकण्यात येतो. याशिवाय भागात पदपथ नसल्याने पायी चालणाऱ्यांना वाहनांचा त्रास होतो. रस्त्याच्या कडेला वाहने उभी असतात. भरधाव आलेल्या वाहनांमुळे लहान मुलांचे खेळणे कठीण झाले आहे.  – संध्या गिनगुले, मिरे लेआऊट

डांबरीकरण उखडले

गुरुदेवनगर पेट्रोल पंप ते संत जगनाडे चौकाकडे जाणाऱ्या नाल्याशेजारील डांबरी रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या भागात शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे उनाड मुले या भागात फिरताना दिसतात. तसेच रात्री उशिरापर्यंत मुलांचे गट चौका-चौकात बसलेले राहतात. रात्री अचानक पथदिवे बंद पडतात. तक्रार केल्यानंतरही तातडीने दिवे उजाडले जात नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. हा सर्व भाग विकसित असला तरी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बिल्डिंग मटेरिअल किंवा कचरा पडलेला दिसून येतो.  – भूषण मानापुरे, न्यू नंदनवन.

सर्वत्र डांबरीकरणाची कामे

बापूनगरमधील पटांगणावर फ्लोिरग केले. या वस्तीमधील सगळ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले. कबीरनगर, उज्ज्वल शाळेमधील मुख्य रस्ता तसेच गुरुदेवनगरातील रस्त्यांवर डांबरीकरण केले. नंदनवनमधील गणपती मंदिर, हनुमान मंदिर परिसरात ‘पेव्हर ब्लॉक’ बसवले आणि फ्लोरिंग केले. प्रशांतनगरमध्ये पदपथ आणि विंधन विहीर बांधली.  – किशोर कुमेरिया, विद्यमान नगरसेवक

 

आरक्षण असे आहे

  • अ – नामाप्र
  • ब – नामाप्र (महिला)
  • क – सर्वसाधारण (महिला)
  • ड – सर्वसाधारण

लोकसंख्या

  • एकूण मतदार – ६६,८२८
  • अनुसूचित जाती – ७,४७३
  • अनुसूचित जमाती – ३,२७७

प्रभागाची रचना

ओमनगर, सुदामपुरी, गुरुदेवनगर, मिरे लेआऊट, माकडे लेआऊट, बापूनगर, आनंदनगर, राजेंद्रनगर, न्यू प्रशांतनगर, न्यू नंदनवन, नंदनवन कॉलनी, हसनबाग, सद्भावनानगर, वंदावन-एमआयजी व एलआयजी, आयुर्वेदिक कॉलेज, आयुर्वेदिक लेआऊट