वारांगनांच्या मुलांचा सांभाळ करून त्यांचे शिक्षण करणे, त्यांच्यापाठोपाठ खाण कामगारांच्या मुलांनाही शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, एवढेच नव्हे तर एकल पालक किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या मुलांनाही शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम इंगोले गेल्या कित्येक वर्षांपासून काम करीत आहेत. सध्या त्यांना वृद्धाश्रमाचे वेध लागले आहेत. पाचगावमधील त्यांच्या आश्रमाच्या जागेतच वृद्धाश्रमाचे काम सुरू आहे. ही आणिक काय उपरती झाली? अशी शंका एखाद्याच्या मनात येऊ शकते! पण सर्व काही अनाथ, गरीब, वंचित मुलांसाठीच असे व्रत घेतलेल्या राम इंगोले यांनी हे वृद्धाश्रमही मुलांच्या भल्यासाठीच सुरू करायचे ठरवले आहे. मात्र, अद्याप वृद्धाश्रमाचे नाव ठरवायचे आहे.
साधारणत: अपत्यहीन किंवा ती असूनही आईवडिलांचा सांभाळ न करणारी, मुले विदेशात किंवा मरण पावले असल्यास अशी वृद्ध मंडळी आयुष्याच्या उत्तरार्धात वृद्धाश्रमांचा आधार घेतात. नातेवाईकांमुळे त्रासलेले किंवा कधीकधी जीवाची सर्व सुखे उपभोगून संसारातून विरक्ती पत्करलेले लोकही आश्रमात येऊन राहतात. मात्र, नातवांवर संस्कार करण्यासाठी आजोबा या संकल्पनेतून वृद्धाश्रमाची कल्पना राम इंगोले साकारणार आहेत. उत्तर नागपुरात मुले आणि वृद्धांसाठी ‘जीवनाश्रय’ हे वृद्धाश्रम आहेच, पण इंगोले यांच्या आश्रमात वाईट वातावरणातून आलेल्या मुलांवर संस्कार करण्याची मोठी जबाबदारी वृद्धाश्रमात येणाऱ्या आजोबांवर असणार आहे. वेगवेगळ्या वयोगटात ही मुले संस्थेत दाखल होतात. मुलांच्या राहणीमानाचा दर्जा वाढावा, चांगले जगण्याची ऊर्मी त्यांच्यात जागृत व्हावी, समाजात वावरताना अंगी सभ्यता निर्माण व्हावी, मन संस्कारित व्हावे आणि मानसिकता सुदृढ व्हावी, या हेतूने त्यांनी वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या वृद्धाश्रमाच्या वास्तूचे ९० टक्के बांधकाम सुरू असून येत्या १५ दिवसात ती पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
वृद्धाश्रमात एकूण २० खाटा असून वृद्धांची राहण्याची, खाण्याची नि:शुल्क सोय करण्याचे योजिले आहे. मुले आजारी असल्यास त्यांना ज्या डॉक्टरांकडे नेले जाते, तेथेच वृद्धांनाही त्यांच्या प्राथमिक आजारासाठी नेले जाईल. मात्र, मोठी शस्त्रक्रिया किंवा मोठा आजार असेल तर त्यावर संबंधित वृद्धालाच खर्च करावा लागेल. वाटल्यास सेवा आश्रमातून पुरवली जाईल. तेथे राहणाऱ्या वृद्धांना त्यांची खोली स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घर कामगार हवा असल्यास तो त्यांचा त्यांनी आपसी संमतीने ठरवायचा आहे, असे प्राथमिक नियम सध्या बनवले आहेत. श्याम रसोई ग्रुपच्या उषा अग्रवाल, शंकरलाल अग्रवाल, श्याम अग्रवाल, दिलीप अग्रवाल आणि शंकर गोपाल अग्रवाल यांनी ही वास्तू बांधून देण्यात सहाय्य केले.
वृद्धाश्रम या प्रकल्पाविषयी राम इंगोले म्हणाले, एकूण २० खाटांचे वृद्धाश्रम नि:शुल्क राहील. कोणाला वृद्धाश्रमात घ्यायचे याचे काही निकष ठरवणार आहोत कारण वृद्धाश्रम वृद्ध लोकांच्या प्रेमाखातर बांधले नसून माझ्या मुलांच्या मानसिक, बौद्धिक, सामाजिक गरजेखातर ते बांधले आहे. मुलांचा सर्वागीण विकास व्हावा, त्यांच्या संस्कारश्रम मनाला योग्य दिशा मिळावी, त्यातून मुलांना हव्या त्या क्षेत्राची माहिती होऊन गोडी लागावी तसेच जगाचे जगण्याचे नियम त्यांनी अंगिकारावेत यासाठी हे वृद्धाश्रम बांधण्यात आले आहे. नातू आणि आजोबांमधील स्नेह वृद्धिंगत होऊन माझी मुले घडावीत, हा वृद्धाश्रमाचा हेतू आहे. पैसा मिळवणे किंवा वृद्धांची सेवा करणे असा या वृद्धाश्रमाचा अजिबात हेतू नाही. पुढच्या महिन्यात वृद्धाश्रम बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे.