लोकांकिका स्पर्धेसाठी कलावंतांचे परिश्रम; प्राचार्य, महाविद्यालयांचेही सहकार्य

कुठलाही उपक्रम किंवा नाटक म्हटले तर त्याचे आर्थिक गणित आधी जुळवावे लागते. लोकसत्तातर्फे आयोजित लोकांकिका स्पर्धाही त्याला अपवाद नव्हती. या स्पर्धेतील एकांकिकेच्या खर्चासाठी प्रसंगी  पॉकिटमनीचा वापरला, अशी प्रतिक्रिया स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी दिली.

ललित कला विभागाच्या ‘अथांग’मधील सामाजिक कार्यकर्तीची भूमिका वठवणारी सायली कुबडे म्हणाली, आर्थिक बाजू महत्त्वाची असतेच. पण, ज्यांना नाटक करायचेच असते ते काहीही करून नाटक बसवतातच. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. महाविद्यालयाने पैसा नाही दिला आणि साहित्य महाग असले म्हणून काय झाले? वर्गणी करूनही ती गरज पूर्ण करता येते. ‘भाजी वांग्याची’या राष्ट्रीय ज्युनियर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही बसायला लागणारे ‘मोडे’ इतर संस्थांकडून मिळवल्याचे सांगितले. मैत्रिणीच्या घरी नाटकाचा सराव केला. सर्व आपापल्या घरून जेवण करूनच यायचे. त्यामुळे नाश्त्याचा खर्च लागला नाही. प्रायोजक मिळाले नाही. त्यामुळे वर्गणी करूनच खर्च भागवला. ‘चला निघायची वेळ झाली’ या अमरावतीच्या शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पांडे म्हणाली, याकामी महाविद्यालयाची मोठी मदत झाली.

अमरावतीच्या ‘रूबरू’ एकांकिकेच्या कलावंतांचा नागपूपर्यंतचा प्रवास तर अतिशय संघर्षमय होता. म्हणजे अगदी सरावासाठी जागा मिळण्यापासून ते प्राथमिक फेरीत पोहोचेपर्यंत त्यांना परवानगी काढणे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्याना समजावून सांगण्यापर्यंतचे काम करावे लागल्याचे  दिग्दर्शक, कलाकर गिरीजा पातुरकर आणि शरयू परळकर यांनी सांगितले. ‘घायाळ पाखरा’ही देखील मर्यादित कलावंत असलेली एकांकिका नवप्रतिभा कला व वाणिज्य महाविद्यालयाने सादर केली. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या तालमीच्या वेळच्या न्याहारीपासून ते एकांकिकेतील सादरीकरणापर्यंत सर्व खर्च केल्याचे रोहित वानखेडे आणि साची तेलंग यांनी सांगितले. ‘बाकी सर्व ठीक आहे’मधील संगीत संयोजक अभिजित मेश्राम आणि कलावंत सौरभ फुलझेले म्हणाले, एकांकिकेत काम करणे सोपे नाही. घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. सौरभ मामाकडे राहतो. शेतीत काम आणि मामाचे पानाचे दुकान सांभाळून तो शिक्षण घेत आहे. अभिजित याला तर नाटकाच्या संगीतात विविध प्रयोग करण्याची इच्छा आहे. फक्त घरच्यांची मदत मिळावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.