पत्नीचा शोध सुरू

कानपूरजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात नागपुरातील सेवानिवृत्त शिक्षक अरुण आदमने यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नी पद्मा आदमने गंभीर जखमी असून नातेवाईक त्यांच्या शोध कानपूरजवळील विविध रुग्णालयात घेत आहेत.

[jwplayer dxIMjswX]

गणेशपेठ, चोपकर मार्ग येथील निवासी अरुण आदमने (६५) आणि पद्मा आदमने (५८) हे शनिवारी रात्री इंदूरवरून बनारससाठी गाडीत बसले. या गाडीला रविवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत अरुण यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पद्मा गंभीर जखमी असून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असावे म्हणून आदमने दाम्पत्यांचे कानपूर येथील नातेवाईक रोहित पवार त्यांचा शोध घेत आहेत. सर्व रुग्णालयात मोठय़ा संख्येने जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पद्मा यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. आदमने दाम्पत्य ‘एस-१’ डब्यातून प्रवास करीत असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मालगाडी घसरल्याने गाडय़ांना फटका

दरम्यान, राय़पूरजवळ सिलीयारी-मांढरदरम्यान मालगाडी रुळावरून घसरल्याने नागपूरमार्गे धावणाऱ्या काही गाडय़ा रद्द, तर काहींच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे काही किलोमीटपर्यंत रूळ उखडले आहेत. त्याचा परिणाम इतर मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांवर झाला आहे. रविवारी १२८५६/१२८५५ नागपूर-बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस रायपूर व बिलासपूरदरम्यान रद्द करण्यात आली. ही गाडी रविवारी नागपूर ते बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस रायपूपर्यंत जाईल आणि तेथून ही परत नागपूरकडे येईल. याशिवाय, हावडा मार्गावरील आठ गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. रायपूर-इतवारी पॅसेंजर, गोंदिया-दुर्ग मेमू, गोंदिया-दुर्ग स्पेशल, गोंदिया-रायपूर एक्स्प्रेस, कोरबा-यशवंतपूर एक्स्प्रेस, गेवरा रोड-रायपूर पॅसेंजर, डोंगरगड-बिलासपूर पॅसेंजर आदी गाडय़ा रविवारी रद्द करण्यात आल्या.

[jwplayer V4vR1CQw]