एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकणात सीबीआयला परवानगी

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाला वेगळे वळण लागले असून संपत्तीच्या वादातून त्यांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे सीबीआयने पॉयोनिअरचे संचालक अरुण नायर व ग्रीन लॅव्हरेज बांधकाम कंपनीचे मालक उमेश गुप्ता यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी मागितली व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ती मंजूर केली. ही चाचणी मुंबई किंवा दिल्ली येथे केली जाण्याची शक्यता आहे.

६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी  निमगडे मॉर्निग वॉकला जात असताना दुचाकीवरून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे मृताचा मुलगा अ‍ॅड. अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला. दरम्यान, वर्धा मार्गावरील जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हिंदुस्तान ट्रॅव्हल्सचे मालक मकसूद अली सिद्दीकी, पॉयोनिअरचे संचालक अरुण नायर, ग्रीन लॅव्हरेज बांधकाम कंपनीचे संचालक उमेश गुप्ता यांच्याशी साडेपाच एकर जमिनीचा वाद सुरू होता, अशी माहिती समोर आली. वर्धा मार्गावर हॉटेल सेंटर पॉईंट परिसरात ही जमीन असून ती सिद्दीकी यांच्या मालकीची आहे. १९८२ साली या जागेचे व्यवहार इंडियन सिटीझन वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीशी ३३ लाखात झाले होते. परंतु निमगडेंनी सिद्दीकी यांना पूर्ण पैसे दिले नाही. त्यामुळे जमिनीचा वाद कायम होता. या वादातून हा खून झाल्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीतील सीबीआयचे अधिकारी प्रकरणाचा तपास करीत असून त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.टी. खराळे यांच्यासमक्ष अर्ज करून नायर व गुप्ता यांची ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ व नार्को चाचणी करण्याची परवानगी मागितली. गुप्ता यांच्या वकिलांनी ब्रेन मॅपिंगसाठी होकार दिला.

त्यानंतर न्यायालयाने तीन महिन्यांत दोघांचीही ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याचे आदेश दिले. या चाचणीपूर्वी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात यावी व चाचणीवेळी त्यांचे वकील उपस्थित राहतील, असे स्पष्ट केले. अनुपम निमगडे यांनी एक माजी केंद्रीय मंत्री व कुख्यात गुंड संतोष आंबेकर यांच्यावरही खुनाचा संशय व्यक्त केला होता.