मंगेश राऊत

बाबरी विध्वंसानंतर उसळलेल्या दंगलीत हल्ला;  शुद्धीवर येताच दिले गोळीबाराचे आदेश

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
mumbai shivsena corporator marathi news, one more uddhav thackeray corporator joins eknath shinde
मुंबई : ठाकरे गटाचे आणखी एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत
raj thackeray shrikant shinde marathi news, raj thackeray ulhasnagar firing case marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

अयोध्या येथील बाबरी मशीद पाडल्यानंतर उपराजधानीतील मोमिनपुरा परिसरात दंगल उसळली होती. या ठिकाणी भेट द्यायला गेलेले तत्कालीन पोलीस आयुक्त अरविंद इनामदार यांच्यावर दंगलखोरांनी हल्ला केला होता. पण, उपराजधानीच्या पोलीस दलातील कमांडोंच्या हिंमतीमुळे त्यांचे प्राण वाचले होते.

अरविंद इनामदार यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी उपराजधानीत विविध पदावर राहून सेवा केली. उपायुक्त म्हणून वाहतूक विभागाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ते नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक होते. पोलीस महानिरीक्षक झाल्यानंतर ऑक्टोबर १९९१ मध्ये त्यांच्याकडे नागपूर पोलीस आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यावेळी उपराजधानीत १८ पोलीस ठाणी होती. अजनी, पाचपावली, जरीपटका परिसर गुंडगिरीसाठी ओळखला जायचा. सायंकाळी ८ वाजेनंतर त्या परिसरातून जाण्यासही लोक घाबरत होते. दिवसाढवळ्या त्या भागात लुटमार व्हायची.

या परिस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. शरीराने धाडधिप्पाड व उंचपुरे व्यक्तिमत्त्व असलेले इनामदार खाकीमध्ये अतिशय उठून दिसत. विभागात अतिशय शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख होती. पोलीस शिपाई, अधिकाऱ्यांच्या डोक्यावरील टोपी सरकायला नको, असा त्यांचा दंडक होता. डय़ुटीवर असताना कर्मचाऱ्याच्या डोक्यावर टोपी नसेल, तर ते त्याला मैदानाचे राऊंड मारायला लावायचे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक क्रिष्णा ऊर्फ बच्चू तिवारी, नागेंद्र उपाध्याय आणि अरविंद बारई यांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा मध्यप्रदेशचे काही कर्मचारी कामानिमित्त नागपूर पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावरील टोपी खांद्याच्या पट्टीला अडकवलेली होती. तेव्हा इनामदार यांनी त्यांना सामान खाली ठेवायला सांगून मैदानाचे राऊंड मारण्याची शिक्षा दिली होती. त्यांचे वाहन दिसल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्वप्रथम आपले गणवेश व टोपी तपासत असत. याशिवाय त्यांना कविता गायन व संगीताची खूप आवड होती, असेही उपाध्याय यांनी सांगितले.

अरविंद इनामदार यांनी विशेष सुरक्षेसाठी केंद्राच्या धर्तीवर शहर पोलीस दलात कमांडो पथक तयार केले होते. त्या पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कमांडोप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या पथकाला ‘क्रॅक कमांडो’ असे नाव देण्यात आले होते. कमांडोची एक तुकडी इंदोरा व दुसरी तुकडी संघ मुख्यालयात तैनात असायची. ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्या येथे कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगल उसळली होती. उपराजधानीतील मोमिनपुऱ्यात तणावपूर्ण वातावरण होते. मोमिनपुऱ्यात राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यादरम्यान पोलीस आयुक्त इनामदार व गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त सतीश माथुर यांनी मोमिनपुऱ्याला भेट दिली. अचानक मोमिनपुऱ्यात दंगल उसळली. जमावाकडून होणारी दगडफेक व हल्ला बघून एसआरपीएफचे सुरक्षा रक्षक पळून गेले. अशा परिस्थितीत पोलीस आयुक्त व उपायुक्त मोठय़ा मशिदीजवळ अडकले होते. ही माहिती मिळताच कमांडोचे पथक आत घुसले. पोलीस आयुक्त व उपायुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असताना एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून सोडा बॉटलमध्ये मिरची भरून व विटा पोलीस आयुक्तांवर फेकण्यात आल्या. एक वीट त्यांच्या डोक्यावर लागली. डोक्यात हेल्मेट असतानाही जबर धक्का बसल्याने ते काहीवेळ बेशुद्ध झाले. एका दुकानाच्या टिनाच्या शेडमध्ये त्यांना बसवण्यात आले. पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणले. शुद्धीवर येताच त्यांनी कमांडोंना गोळीबाराचे आदेश दिले होते, अशी माहिती त्यावेळी कमांडोच्या एका तुकडीचे नेतृत्व करणारे बच्चू तिवारी यांनी दिली.

ऑटोमॅटिक रायफलमधून गोळीबाराला विरोध

त्यावेळी मोमिनपुऱ्याच्या मधोमध ३५ कमांडो होते. प्रत्येकाकडे ऑटोमॅटिक रायफल्स व एकाकडे १५० काडतुसे होती. या रायफल्समधून गोळीबार केला असता तर सर्व मोमिनपुऱ्यातून रक्ताचे पाट वाहायला लागले असते. त्यावेळी सतीश माथुर यांनी परिस्थिती सांभाळत आयुक्तांना विरोध केला. पोलीस मुख्यालयातून मस्कॉट बंदुका मागवण्यात आल्या. तोपर्यंत दंगलखोरांवर अश्रूधुराचे बॉम्ब टाकण्यात आले. मस्कॉट बंदुका व एक पेटी काडतुसे येताच गोळीबार सुरू करण्यात आला. यात जवळपास १२ ते १३ दंगलखोरांचा बळी गेला. त्यानंतर उर्वरित दंगलखोर पळून गेले. गोळीबार केला नसता तर दंगलखोरांनी पोलीस आयुक्त व उपायुक्तांना संपवले असते, अशी माहिती तत्कालीन कमांडो बच्चू तिवारी यांनी दिली.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सॅल्यूट

एकदा समाजकंटकाने महालातील गांधी गेटसमोर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यावेळी लोकांनी तीव्र आंदोलन केले होते. तेव्हाच इनामदार यांनी एक तलवार विकत घेतली व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोहोचले. महाराजांच्या पुतळ्याला कडक सॅल्यूट ठोकला व विधिवत पूजा करून वाकलेली तलवार काढून घेतली व नवीन तलवार ठेवली. त्यानंतर आंदोलकांची तक्रारही ऐकली. तेव्हा आंदोलनकर्ते शांत झाले, असेही तिवारी यांनी सांगितले.