अविष्कार देशमुख

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या तेल कंपनीचे खाजगीकरण होत असल्याने पेट्रोलपंप चालकांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीपीसीएलकडून पेट्रोलपंप चालकांना दिली जाणारी सेवा कमी करण्यात आली आहे. तसेच बीपीसीएल कंपनीच्या वितरण अधिकाऱ्यांच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.

केंद्र सरकारने सरकारचा मालकी हक्क असलेल्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी तेल कंपनी बीपीसीएलचा देखील समावेश आहे. आतापर्यंत कंपनीच्या खरेदीसाठी तीन बोली लागल्या. यामध्ये वेदांतासह ग्लोबल स्क्वेअर आघाडीवर आहे. मात्र  खाजगीकरण अटळ असल्याने पंपचालकांना मिळणाऱ्या इतर सेवा प्रभावीत झाल्या आहेत. देखभाल दुरुस्तीकडे कंपनीने पाठ फिरवली आहे. त्यासोबतच पंपचालकांच्या पेट्रोल व डिझेलच्या खपानुसार त्यांना लक्ष्य दिले जाते. त्यानुसार महिन्याला १५ टँकर इंधनाचा खप असल्यास त्यात वाढ करून ते २० केले जाते. परंतु  मागील काही माहिन्यांपासून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच तेल कंपनी अधिकाऱ्यांच्या पंपचालकांसोबत होणाऱ्या बैठकाही कमी झाल्या आहेत. प्रत्येक पंपाचे अंकेक्षण देखील थांबले आहे. दर महिन्याला कंपनीचे वितरण अधिकारी चार ते पाच फेऱ्या मारून आढावा घ्यायचे. मात्र आता अनेक महिन्यांपासून वितरण अधिकारी देखील येत नाही. प्रत्यक्ष खाजगीकरण झाल्यावर कोणते नवे नियम लादण्यात येथील यार्ची चिंता पंपचालकांना सतावत आहे. खाजगीकरणामुळे याशिवाय प्रतिलिटर वरील नफा किती मिळेल, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

कोणतीही कंपनी विक्रीस काढल्यावर खर्च कसा कमी करता हे बघितले जाते. ही नैर्सिगक प्रक्रिया आहे. बीपीसीएलचे खाजगीकरण होणार असल्याने नूतनीकरणाच्या सेवांसह  इतर सेवादेखील मंदावल्या आहेत.

– अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.