पद्मश्री, पद्मभूषण यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रांतील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात व त्यांचे मन राखण्यासाठी नेत्यांकडूनही शिफारस पत्रे वाटली जातात, असा गौप्यस्फोट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. नामवंत ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी या संदर्भात केला.
सेवासदनच्या नागपूर शाखेतर्फे शनिवारी नागपूर येथे शिक्षण-प्रबोधन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारासाठी अर्ज न मागवता व्यक्ती किंवा संस्थांच्या कार्याची माहिती घेऊन निवड करा, असे आवाहन करताना गडकरी यांनी त्यांना पुरस्कारासाठी कराव्या लागणाऱ्या शिफारशींचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस करावी म्हणून अनेक मान्यवरांकडून नेत्यांना विनंती केली जाते. नाराज होऊ नये म्हणून शेकडो लोकांना शिफारसपत्रे द्यावी लागतात, तशी मीसुद्धा देतो. पद्मश्री प्राप्त करणाऱ्यांना पद्मविभूषण हवे असते, हे सांगताना त्यांनी आशा पारेख यांच्या भेटीचा किस्साही सांगितला. मुंबईत त्या १२ मजले चढून मला भेटायला आल्या होत्या. पद्मश्री मिळाली आहे, पण पद्मभूषणसाठी तुम्ही प्रयत्न करा, अशी विनंती त्यांनी केली होती, असे गडकरी म्हणाले. या वेळी त्यांनी पारेख यांच्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेखही केला.