28 January 2021

News Flash

Ashadi Ekadashi 2020 : घरच्या ‘पंढरी’तच विठूरायाचे नामस्मरण!

आज आषाढी एकादशी

आज आषाढी एकादशी

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त नागपुरातील अनेक वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने निघायचे. यंदा मात्र करोनामुळे ही यात्राच रद्द झाली आहे. त्यामुळे नागपूरकर घरच्या ‘पंढरीत’ आपल्या कुटुंबीयांसोबतच आषाढी एकादशी साजरी करणार आहेत.

दरवर्षी विदर्भातील पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडय़ासह शहरातील विविध मंदिरात  टाळ मृदुंगाच्या जयघोषात विठ्ठल नामाचा गजर केला जातो. मात्र यावर्षी हे सुखद चित्र नाही. दरवर्षी  विदर्भातील मानाच्या २५ ते ३० दिंडय़ा पंढरपूरला पायी वारीला जायच्या. परंतु यावर्षी केवळ मानाची अमरावती जिल्ह्य़ातील कौंडिण्यपूरमधील पालखी बसने निवडक वारकऱ्याच्या उपस्थित पंढरपूरला रवाना झाली.

नागपुरात गणेशपेठ येथील जोशींचे विठ्ठल मंदिर, कर्नलबाग येथील नामदेवबुवा ढेंगे यांचे विठ्ठल मंदिर, भोसलेकालीन घुईंचे विठ्ठल मंदिर आणि नबाबपुरा भागातील विठ्ठल मंदिर, जुनी मंगळवारी भागातील मारोतराव राऊत यांच्याकडील विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणज प्रती पंढरपूर आहे. येथेही दरवर्षी गर्दी व्हायची. परंतु यंदा नागरिकांनी मंदिरात न येता घरीच पूजा करावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व वारकरी सेवा समितीने केले आहे.

वारीचा आनंदच वेगळा

गेल्या ६० वर्षांपासून पायीवारी करणारे ह.भ.प. श्रीरामपंत जोशी यांनी सांगितले, कितीही कठीण प्रसंग आले तरी वारी चुकली नाही मात्र यावेळी वारीला जाण्यासाठी परवानगी नाही. नागपुरात ५० हून अधिक विठ्ठल मंदिरे आहेत. त्या मंदिरातील प्रमुख वारकरी वारीसाठी पंढरपूरला जात असतात. विदर्भातून गेलेल्या विविध पालख्या पंढरपूरला वेगवेगळ्या मठात वास्तव्य करतात. वारीचा वेगळा आनंद असतो. कुठलाही जाती धर्माचा विचार न करता सर्व एकत्र येऊन विठ्ठल नामाचा गजर करतात, असेही जोशी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:50 am

Web Title: ashadi ekadashi 2020 zws 70
Next Stories
1 शिकाऊ वाहन परवान्याच्या कोटय़ात ७५ टक्क्यांनी कपात!
2 टाळेबंदीमुळे रेल्वेला कोटय़वधींचा फटका
3 पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात खाणकामास बंदी
Just Now!
X