आ.आशीष देशमुख यांचा घरचा आहेर

मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनाची दखल घेत नाही, त्यांनी लोकांचा विश्वास गमावला असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. भाजपच्या एखाद्या आमदाराने थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची ही या सत्ताकाळातील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हे आमदार मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्य़ातील आहे.

गारपीटग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आशीष देशमुख दोन तीन दिवसांपासून काटोल येथे उपोषणावर बसले आहेत. आज त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा आले होते. यावेळी झालेल्या सभेत देशमुख यांनी वरील मागणी केली. भाजपमध्ये प्रवेश करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, असा विश्वास होता. मात्र तो फोल ठरला. मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतक ऱ्यांचा विश्वास गमावला आहे. त्यांना फक्त नागरी भागाचाच कळवळा आहे. शेतक री संकटात असताना त्यांना साधी सहानुभूती दाखवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. काटोल आणि नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी रस्त्यावर उतरले असताना मुख्यमंत्र्यांकडे संमेलनाला जाण्यासाठी वेळ आहे. पण काटोलमध्ये ते येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदी राहण्याचा अधिकार नाही, असे देशमुख म्हणाले.

कारवाईस तयार

मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितल्याने पक्ष माझ्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई करेल, मात्र आता कुठल्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे सांगून देशमुख यांनी ते नाना पटोलेंच्या मार्गावर जात असल्याचे संकेत दिले.