सरकार गुंतवणूक वाढल्याचा दावा करीत असलेतरी राज्यातील असहिष्णू वातावरणामुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीबाबत साशंक आहेत, असे सांगून देवेंद्र फडणवीस सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तोफ डागली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस विधान भवनावर मोर्चा काढणार आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण बुधवारी नागपुरात आले होते.

गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण हवे असते. राज्य सरकारने असहिष्णुतेला पायबंद घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे राज्यातील उद्योजक इतर राज्यात जात आहेत. राज्यात ज्यांची गुंतवणूक आहे त्यांना आपल्या गुंतवणुकीचे काय होईल याची चिंता लागली आहे, असे चव्हाण म्हणाले. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली. एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेडच्या सभेत फडणवीस सरकार राज्य करण्याच्या लायक नसल्याचे सांगतात तर मग सत्तेतील सहभागाच्या वर्षपूर्तीचा उत्सव कशाच्या आधारावर शिवसेना साजरा करणार आहे, असा सवाल करून शिवसेनला सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या सरकारची जबाबदारी झटकता येणार नाही. शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते असताना ५० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी देण्याची मागणी केली होती. सत्तेत गेल्यानंतर या मागणीचा त्यांना सोईस्कर विसर पडला आहे.

केंद्राचा निधी शून्य
लोकसभेत कृषीमंत्र्यांनी लिखित उत्तरात दिलेल्या माहितीवरून केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असल्याचे दिसून येते. राज्य सरकारने दुष्काळासाठी चार हजार कोटींची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय पथकाने दोन-तीनदा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. पण केंद्र सरकारने एक रुपयादेखील राज्याला दिलेला नाही. शिवाय दुष्काळाचे मूल्यमापन झालेले नाही.