विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची एमपीएससी अध्यक्षांसोबत चर्चा

नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर, २०२० रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता राज्यातील सर्व सातही विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. यासंदर्भात एमपीएससीकडून उद्या सविस्तर महितीपत्र प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. करोनामुळे विद्यार्थी सध्या स्वगृही परतल्याने त्यांना केंद्र बदलवून देण्याचा विषय लोकसत्ताने वारंवार लावून धरला होता हे विशेष.

वाहतूक व्यवस्था आणि करोनाचे वाढते संकट बघता बाहेरील केंद्रावर परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. लोकसत्ताने विद्यार्थ्यांच्या या समस्येला वाचा फोडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. सतीश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही. ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी, अशी सूचना केली. अखेर २० सप्टेंबर, २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

अशी असेल व्यवस्था?

विभागीय केंद्रावर कशी सोय राहणार यावर अद्याप एमपीएससीकडून स्पष्ट निर्देश आले नसले तरी विद्यार्थ्यांना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी केंद्र बदल मिळण्याऐवजी आता किमान विभागीय केंद्रावर परीक्षा  घेतली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे चंद्रपूर येथील मुलाने आधी पुणे हे केंद्र निवडले असेल, पण करोनामुळे तो स्वगृही असून त्याला आता चंद्रपूर केंद्र हवे असल्यास किमान जवळच्या नागपूर विभागीय केंद्रावर परीक्षा देण्याची सोय केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी विभागणी ठिकाणावरील केंद्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यासंदर्भात एमपीएससीने अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.