14 December 2017

News Flash

विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांत सहा.प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदोन्नती अडली

सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदोन्नती प्रशासकीय घोळात अडकली आहे.

महेश बोकडे, नागपूर | Updated: October 10, 2017 2:18 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

विदर्भातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील सुमारे ५० सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदोन्नती प्रशासकीय घोळात अडकली आहे. ही पदे रिक्त असल्यामुळे सर्व संस्थांमध्ये रुग्णांच्या तपासण्या विलंबाने होत आहे.

विदर्भात नागपूरच्या मेडिकल, मेयोसह अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया ही सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. या सर्वच ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञांची तब्बल ५५ पदे रिक्त आहेत. त्या खालची सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञांचीही काही पदे रिक्त आहेत. यामुळे रोज रुग्णांच्या विविध तपासण्यांना विलंब होत आहे. परिणामी, आजाराचे निदान होण्यासही वेळ लागतो. त्याचा रुग्णांनाही फटका बसतो. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने राज्यातील वैद्यकीय संस्थांमध्ये सात वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञांना पदोन्नत करून त्यांची प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळसह इतर काही संस्थांमध्ये सहाय्यक तंत्रज्ञांना पदोन्नती मिळाली. त्याकरिता अनुभवाचे नियमही शिथिल झाले, परंतु प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागपूरच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला नाही.

ही बाब निदर्शनात आल्यावर वैद्यकीय संचालकांनी  विदर्भाचे नोडल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना चतुर्थ व तृतिय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे विशेष अधिकार दिले. त्यानुसार डॉ. निसवाडे यांनी  विदर्भातील सुमारे ५० कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले, परंतु नियमांवर बोट ठेवत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा निर्णय थांबवला. अधिष्ठाता कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली जात नाही, त्यासाठी वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यामुळे असंतोष आहे.

लवकरच पदोन्नती होणार

विदर्भातील ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ५० सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदोन्नती शासनाचे नोडल अधिष्ठात्यासह इतर आवश्यक पत्रे नसल्यामुळे थांबली होती, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पत्र मिळाले आहे. त्यामुळे लवकरच या पदोन्नती होतील व सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञांचेही पद भरले जाईल. त्याने रुग्णांना अद्ययावत सेवा मिळेल.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे,

विदर्भाचे नोडल अधिष्ठाता, वैद्यकीय शिक्षण विभाग

First Published on October 10, 2017 2:18 am

Web Title: assistant laboratory technicians promotions stuck in medical colleges in vidarbha