राजकीय नेते मुहूर्त शोधण्यात मग्न

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून भाजप, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, आता उमेदवारी अर्ज केव्हा भरावा, यासाठी ज्योतिष्याचा आधार घेतला जात आहे. उमेदवारी मिळालेले राजकीय नेते कुठला दिवस आणि वेळ शुभ आहे, याची चाचपणी करीत आहेत.

पंचांगानुसार विविध कार्यासाठी वेगवेगळे मुहूर्त दिलेले असतात. त्यात तिथी, वार व नक्षत्र यांच्या संयोगाने मिळणारे शुभ-अशुभ आणि फलदेय असे मुहूर्त सूचित केले जातात. त्यानुसार काही उमेदवार ज्योतिष्याचा आधार घेत उमेदवारी अर्ज केव्हा भरावा, त्याचे नियोजन करीत आहेत. या संदर्भात ज्यतिष्याचार्य विलास वखरे यांनी सांगितले, सामान्य व्यक्ती एखादा कार्यक्रम करायचा असेल तर मुहूर्त बघितल्याशिवाय करत नाही तसेच राजकीय क्षेत्रातही आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाचे  उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च आहे. त्यापूर्वी २३ मार्च रोजी स्वाती नक्षत्र आणि सोमवारी २५ मार्चला अनुराधा नक्षत्र आहे. कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी हे दोन दिवस  शुभ व लाभदायक आहेत. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त नामांकन अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.

बुधवारी २७ मार्चला मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे हा दिवस लाभदायक आहे. मात्र, २५ मार्च अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवार २२ मार्च व २६ मार्च हे दोन्ही दिवस धननाश नव कार्यहानी दाखवतात. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले एकाच दिवशी  २५मार्चला  उमेदवारी अर्ज भरणार आहेत, हे विशेष.