04 March 2021

News Flash

Coronavirus : लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांचे उपचारासाठी हाल!

महापालिका कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा पत्ता नाही

(संग्रहित छायाचित्र)

आमदार निवास पूर्ण भरले, मेडिकलमध्ये गैरसोय; महापालिका कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा पत्ता नाही

नागपूर : शहरात करोनाबाधित वाढले असून सक्रिय रुग्णांची संख्या अकराशेच्या पार गेली आहे. आमदार निवासातील कोविड केअर सेंटर हे लक्षणे नसलेल्या रुग्णांनी पूर्ण भरले असून इतरत्र या रुग्णांसाठी जागा नसल्याने मेडिकलच्या वार्ड क्रमांक ११ मध्ये गैरसोयीत रुग्ण ठेवले जात आहेत. दरम्यान, महापालिकेने लक्षावधींचा खर्च करत सुमारे ५ हजार खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले, परंतु तेथे रुग्ण ठेवले जात नसल्याने त्या सेंटरचे करणार काय, हा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित केला जात आहे.

टाळेबंदीनंतर नागपूरसह देशभरात लक्षणे असलेल्या बाधितांसाठी कोविड रुग्णालये तर लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, लक्षणे नसलेल्या रुग्णांना ‘सीसीसी’मध्येच ठेवायचे होते. उपराजधानीत मेडिकल, मेयो रुग्णालयांत दोन कोविड रुग्णालये सुरू केली गेली. नागपूर महापालिकेकडूनही कळमेश्वर रोडवर लक्षावधींचा खर्च करत सुमारे ५ हजार खाटांची क्षमता असलेले कोविड केअर सेंटर उभारल्याचे प्रशासनाने सचित्र दाखवले. परंतु महापालिकेने त्यांच्या सेंटरमध्ये अद्याप एकही बाधिताला ठेवले नाही.

दरम्यान, नंतर आमदार निवासात सीसीसी सुरू केले गेले. येथे सध्या सव्वातीनशेहून अधिक बाधितांना ठेवले असून ते हाऊसफुल्ल झाले आहे. येथे जागा नसल्याने आता लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी मेडिकल व मेयो प्रशासनाला नवीन वार्डात रुग्णांची सोय करावी लागत आहे. मेडिकलमध्ये त्यासाठी वार्ड क्रमांक ११ व १२ दोन दिवसांपूर्वी आपत्कालीन स्थितीत सुरू केले गेले. दोन्ही वार्डात सार्वजनिक स्वच्छता गृह व शौचालये आहेत. त्यात महिला व पुरुष दोन्ही बाधितांना ठेवल्यामुळे दोघेही त्याचा वापर करताना संकोच करतात. त्यामुळे येथील बहुतांश रुग्णांनी दोन दिवसांपासून आंघोळ केली नाही. दरम्यान, हे रुग्ण पाठवताना विशिष्ट कालावधीपूर्वी महापालिकेने मेडिकल प्रशासनाला सूचना दिली नाही. त्यामुळे चव नसलेले जेवण मिळाल्याने अनेकांनी जेवणही केले नाही. ही माहिती वैद्यकीय अधीक्षकांसह  अधिष्ठात्यांच्या निदर्शनात येताच तातडीने त्यांनी सगळ्यांना चांगल्या प्रतीचा नास्ता व जेवण बाहेरून उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला.

१२ कोटींच्या खर्चाचा उपयोग काय?

महापालिकेने करोना काळात शासनाकडून उपलब्ध झालेल्या सुमारे १२ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील त्यांची पाच रुग्णालये अद्ययावत करून घेतली. यापैकी काही रुग्णालयांमध्ये रुग्णही नाहीत. त्यामुळे या रुग्णालयांत लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांवर कोविड केअर सेंटर तयार करून उपचार शक्य आहेत. परंतु येथे उपचाराची सोय करून मेडिकल, मेयो, एम्सवरील भार कमी केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विलगीकरणासाठीची यंत्रणाही विस्कळीत

करोनाबाधित आढळताच त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात घेऊन त्यांचीही तपासणी केली जात होती. परंतु हल्ली शहराच्या सर्वच ठिकाणी  बाधित  आढळणे सुरू झाले आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना वेळीच गाठणे तर सोडाच  बाधितांनाही रुग्णालयात दाखल करायला दोन दिवस लागत असल्याने संक्रमण वाढण्याचा धोका आहे. धंतोलीतील एक बाधित बुधवारी सकाळी मेडिकलमध्ये दगावला. परंतु त्याच्या संपर्कातील काहींना वेळीच विलगीकरणात न नेल्याची तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत.

कळमेश्वर मार्गावरील कोविड केअर सेंटरमध्ये वीज फिटिंगसह सांडपाणी वाहिनीशी संबंधित कामे सुरू असल्याने ते तूर्तात सुरू करता येत नाही. परंतु सदरमधील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय आणि मिहानमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात लवकरच कोविड केअर सेंटर तयार केले जात आहे. कळमन्यातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात नवीन विलगीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. सोबत मेडिकल, मेयोत रुग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या रुग्णालयांतही बाधितांना ठेवण्याची लवकरच सोय केली जाईल.’’

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:39 am

Web Title: asymptomatic coronavirus patients face problem for treatment zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लोकजागर : टाळे नव्हे ‘झापड’बंदी!
2 Coronavirus : आणखी तीन बळी; १२२ नवीन बाधितांची भर!
3 १२ कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा महापालिकेचा निर्णय वैध
Just Now!
X