30 September 2020

News Flash

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभातही आता उत्तरीये

दहा दिवसांपूर्वी ‘व्हीएनआयटी’ने डगला आणि टोपीला नकार देत केवळ उत्तरीये स्वीकारले होते.

(संग्रहित छायाचित्र)

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील निर्णय

व्हीएनआयटी पाठोपाठ  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही पदवीप्रदान समारंभातील डगला-टोपी पद्धत बंद करून जोधपुरी आणि उत्तरीये (स्कार्फ) असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. गुरुवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विविध भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटीज) पदवीप्रदान समारंभासाठी गणवेश बदलल्यानंतर आता नागपुरातही अशा समारंभात गणवेश बदलाची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ‘व्हीएनआयटी’ने डगला आणि टोपीला नकार देत केवळ उत्तरीये स्वीकारले होते.

येत्या डिसेंबरमध्ये विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ होत आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत गुरुवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पदवीप्रदान कार्यक्रमासाठी राज्यपालांची ४२ दिवसांपूर्वी परवानगी घ्यावी लागते.

या समारंभाला रतन टाटा यांना निमंत्रित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्योजक रतन टाटा, मुकेश अंबानी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या तिघांपैकी एकाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा विद्यापीठाचा विचार होता. दरम्यान, गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर सिनेटमध्ये सदस्यांना प्रश्न विचारण्यास नकार दिल्याच्या कारणास्तव कुलगुरूंना दिशानिर्देश मागे घेण्याची मागणी करण्यात आली. लोकशाहीमध्ये अशाप्रकारे सदस्यांच्या अधिकारांना डावलल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा विधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना दिला.

त्यावर कुलगुरूंनी त्यांच्या अधिकारात बाबींची माहिती सदस्यांना दिली. मात्र, त्यामुळे सदस्यांचे समाधान न झाल्याने उद्या, शुक्रवारी विद्यापीठासमोर आंदोलनाची तयारी दर्शवण्यात आली.

माफसूच्या कुलगुरूंचा स्वदेशी परंपरेला छेद

भारतीय परंपरेचा अंगिकार करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. शेरीकर यांनी उत्तरीये पेहरावाचा स्वीकार केला होता. ती परंपरा जवळपास १७ वर्षे सुरू होती. मात्र, गेल्यावर्षी सरसंघचालक मोहन भागवत यांना मानद डिलिट पदवी बहाल करण्याचे औचित्य साधून कुलगुरू आदित्य मिश्र यांनी एका रात्रीत  स्वदेशी परंपरेला छेद देऊन डगला, टोपी आणि उत्तरीये अशी पाश्चिमात्य पद्धत स्वीकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 3:33 am

Web Title: at the universitys graduation ceremony now scarf
Next Stories
1 महिला डॉक्टरने स्वत:च्या गळ्याची नस कापली
2 वनविभागाच्या धोरणांची अंमलबजावणी गरजेची
3 घटनादुरुस्तीच्या पेचात संमेलनाध्यक्षपदाची प्रतिष्ठा धोक्यात
Just Now!
X