News Flash

नागपूरकरच माझे माय-बाप

शहरात रक्ताची एकही व्यक्ती नाही, विद्यापीठात एकही शिख मतदार नाही.

 

अटलबहादूर सिंग यांचे भावोद्गार

शहरात रक्ताची एकही व्यक्ती नाही, विद्यापीठात एकही शिख मतदार नाही. परंतु सिनेट सलग २१ वर्षे निवडून आलो. नागपूरकरांनी भरभरून प्रेम दिले आणि सेवा करण्याची संधी दिली. आज माझे बाबा जिवंत असते, तर त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटला असता. ते जरी हयातीत नसलेतरी नागपूरकरच माझे माय-बाप आणि बंधू आहेत, असे भावपूर्ण उद्गार माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांनी काढले.

एकेकाळी महापालिकेत ‘किंग मेकर’ची भूमिका बजावणारे अटलबहादूर सिंग यांची दिलेला शब्द पाळणारा आणि जात-धर्माच्या पलीकडचा दिलदार माणूस अशीच ओळख आहे. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय मंडळींनी त्याच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम गुरुवारी शंकरनगरातील साई सभागृहात घेतला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, माजी खासदार विजय दर्डा, आमदार अनिल सोले, माजी महापौर कुंदाताई विजयकर, मोहब्बतसिंग तुली हे व्यासपीठावर होते.  मराठी भाषा शिकण्यासाठी शिकवणी लावल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. एका शिक्षकाकडे मराठी भाषेची शिकवणी लावली. त्यावेळी महिन्याला ३० रुपये याप्रमाणे शुल्क होते. महिन्याच्या शेवटी ३० रुपये दिल्यावर त्या शिक्षकांनी १६ रुपये परत केले. असे त्यांनी का केले असे विचारले तेव्हा ते म्हणाले. तू केवळ १४ दिवस शिकवणीला आला. असे शिक्षक मिळाले. त्यामुळेच मी घडू शकलो. नागपूर हे देशातील सर्वात सुंदर शहर असून येथील लोकही तेवढेच मनमिळावू आहेत. त्यामुळे नागपूर शहर सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. अटलबहादूर सिंग यांच्याकडे माणसे जोडण्याची कला आहे. त्यांची प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच नागपुरात गानसम्रागी लता मंगेशकर यांचा सत्कार होऊ शकला. लता मंगेशकर यांनी नागपुरात येण्यास नकार दिला होता. कुंदाताईंना महापौर करण्यासाठी झालेल्या तडजोडीचा उल्लेखदेखील गडकरी यांनी केला. यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे, सतीश चतुर्वेदी, विजय दर्डा यांची भाषणे झाली. संचालन नितीन राऊत यांनी केले. कुंदाताई विजयकर यांनी आभार मानले.

विद्यापीठाची पदवी मराठी, इंग्रजीत

तत्कालीन कुलगुरू भाऊसाहेब कोलते यांच्या काळात नागपूर विद्यापीठाची पदवी मराठी आणि इंग्रजीत देण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल सांगताना अटलबहादूर सिंग म्हणाले, मी आणि मोहब्बतसिंग तुली यांनी पदवी मराठी भाषेत देण्याची मागणी केली होती. त्यावर कोलते यांनी मराठी भाषेतून पदवी दिल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचण होईल, असे सांगितले. परंतु आमचा आग्रह पाहून त्यांनी मराठी आणि इंग्रजीत पदवी देण्याचा मार्ग काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2017 12:47 am

Web Title: atal bahadur singh nagpur
Next Stories
1 निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात नियमबाह्य़ वातानुकूलित यंत्र
2 शहरातील ‘सुपर रांदेन्युअर्स’ने १२०० किलोमीटरचा पल्ला गाठला
3 दुर्गम भागात सेवा देण्यास भावी डॉक्टर उदासिन
Just Now!
X