शंभराच्या नोटांची टंचाई, ग्राहकांना मन:स्ताप; बँकांना रोकड मिळण्यात अडचणी

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने बँका एटीएममध्ये मर्यादित रक्कम जमा करीत आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश एटीएम केवळ दोन तासातच रिकामे होत आहेत. नोटा बंदीनंतर अशी काही स्थिती उद्भवू शकते, याचा अंदाज सरकारला घेता न आल्याने ही अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असून याचा फटका जनतेला बसत आहे.

‘आरबीआय’कडून शहरातील प्रमुख दहा बँकांना दररोज सुमारे तीन ते चार हजार कोटी रुपयांचा पुरवठा केला जातो. या बँका त्यांच्याशी संलग्न असलेल्या बँकांना पतपुरवठा करतात. नोटा बंदीनंतर एटीएममध्ये केवळ १०० रुपयांच्या नोटांचा ‘ट्रे’ भरला जातो. या ‘ट्रे’ची क्षमता दोन लाख ते दोन लाख ४० हजार रुपयांची असते. त्यामुळे शंभर लोकांनी पैसे काढल्यानंतर एटीएम बंद पडतात.

केंद्र सरकारने नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांत सोय केली आहे. तसेच रोख काढण्यासाठी एटीएम सेवाही सुरूकेली. मात्र या सर्वच ठिकाणी नोट टंचाई जाणवू लागली आहे. शहरात राष्ट्रीयीकृत बँकांची ३६० एटीएम केंद्र आहे. तेवढीच खासगी बँकांची आहे. मात्र, सध्या कुठेही फेरफटका मारला तर बोटावर मोजण्या इतकीकेंद्रे सोडल्यास सर्वच एटीएम बंद आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेकडून प्रथम शहरातील मोठी उलाढाल असलेल्या बँकांना (चेस्ट बँक) चलन पुरवठा होतो. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, अलाहाबाद बँक, अ‍ॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक यांच्यासह इतरही काही बँकांना हा चेस्ट बँकेचा दर्जा आहे. या  बॅंकांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून ९ नोव्हेंबरपासून १०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा होत आहे. शहरातील सगळ्याच कंपन्यांच्या एटीएममध्ये १०० रुपयांच्याच नोटा टाकण्याची सोय आहे. मोजक्याच  एटीएममध्ये २००० च्या नोटा मिळतात.  त्यातच रिझव्‍‌र्ह बँके कडूनही चेस्ट बँकांना १०० रुपयांच्या नोटांचा फार कमी पुरवठा होत असल्याचेही विविध बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. या सर्व प्रक्रियेचा फटका सध्या ग्राहकांना बसत आहे.

मंदिरात दानदात्याची संख्या वाढली

नोटाबंदीनंतर शहरातील विविध धार्मिक स्थळांच्या दानपेटय़ांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रक्कम वाढतच आहे आणि व्यवस्थापनाकडेही दान देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दानपेटीत दररोज जमा होणारा पैसा पूर्वीपेक्षा दुपटीने बँकेत भरणा केला जात आहे. शहरातील साई मंदिर, गणेश टेकडी मंदिर, सेमिनरी हिल येथील बालाजी मंदिर, मोठा ताजबाग या धार्मिक स्थळांमध्ये गेल्या पाच सहा दिवसांपासून दान देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या संदर्भात टेकडी गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी कुळकर्णी यांनी सांगितले, गेल्या पाच सहा दिवसांपासून दानदात्याची संख्या दुपटीने वाढली आहे. पाचशे आणि हजाराच्या नोटा घेऊ नका असे कुठलेही धर्मादाय आयुक्तांचे आदेश नाहीत, त्यामुळे आम्ही स्वीकारत असून रोज बँकेत भरणा करीत आहोत.

असा होतो बँकांना अर्थपुरवठा

रिझव्‍‌र्ह बँकेकडून मोठय़ा बँकांना प्रथम नोटांचा पुरवठा केला जातो, तेथून मोठय़ा बँकांशी संलग्नित बँकांना व इतर बँकांना नोटा पाठविल्या जातात. त्यानुसार संबंधित बँका त्याचे वाटप करतात. एटीएमसाठी अर्थपुरवठाही त्यातूनच केला जातो. सध्या अर्थपुरवठाच कमी होत असल्याने सर्वच बँकांची अडचण झाली आहे.

एटीएमची क्षमता .२० लाखांची

‘एटीएम’ मध्ये जुन्या १००, ५००, १००० रुपयांच्या ५ लाखापर्यंत नोटा ठेवण्याची सोय होती. पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा बाद केल्यावर मशिनमध्ये केवळ १०० रुपयांच्याच नोटा टाकल्या जातात. त्याची क्षमता २ लाख २० हजारांची आहे. सध्याच्या परिस्थितीत ही रक्कम दोनच तासात संपून जाते. बँकांकडे नोटा नसल्याने दिवसभरात एकदाच त्या एटीएममध्ये टाकल्या जातात. हे काम काही बँकांचा अपवाद सोडला तर बहुताश बँकांनी खासगी एजंसीकडे दिले आहे.

मोठय़ा बँकांचा दुजाभाव

रिझव्‍‌र्ह बँकेडून रोख मिळाल्यावर मोठय़ा बँकांनी त्यांच्याशी निगडित सर्व बँकांना मागणी प्रमाणे नोटांचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र, या आपत्कालीन स्थितीत या बँका त्यांच्या शाखांना प्रथम नोटा देतात. त्यांच्याशी संलग्न असलेल्या बँकांचा क्रम नंतर येतो. त्यामुळे सलग्न बँकांमध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली आहे.

वारंवार निर्णय बदलाचाही फटका

चलन टंचाई निर्माण झाल्यावर केंद्रीय अर्थ खात्याने व रिझव्‍‌र्ह बँकेने रोज वेगवेगळे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक आदेश हा तांत्रिक यंत्रणेशी निगडित असतो. एटीएममध्ये त्यासाठी तांत्रिक बदल करावे लागतात. त्यामुळेही नोटांची टंचाई वाढली आहे.

बँकेच्या वेळेनंतर एटीएममध्ये रोकड भरणा

शहरातील बहुतांश बँकेकडून ग्राहकांच्या सोईकरिता बँकेची कामकाजाची वेळ संपल्यावर त्यांच्या ‘एटीएम’मध्ये रोकड भरली जात आहे. त्यामुळे बँक सुरू असतांना बँकेतून तर त्यानंतर एटीएममधून ग्राहकांना रक्कम उपलब्ध होणे शक्य असल्याचे बँकेकडून सागण्यात येत आहे.