नागपूर : अजमेर येथे अटक करण्यात आलेला कुख्यात मोहम्मद इरफान ऊर्फ चाचू शमी सिद्दीकी (वय ३८,रा. राजाराम लेआऊट, जाफरनगर ) व त्याचा साथीदार नरेंद्र मधुकर कोडापे (वय ३०,रा. शिवाजी वॉर्ड, वडसा) याची आयबी व दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) सोमवारी कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांच्या माओवाद कनेक्शनबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला.

पाचपावली पोलिसांनी रविवारी  अजमेर येथे सापळा रचून इरफान चाचू, कोडापे, शेख इलियास ऊर्फ इल्लू शेख उमर  (वय ३४, रा. गंजीपेठ), जफर खान ऊर्फ बग्गा कदीर ऊर्फ जहीर खान (वय ३०, रा. बंगाली पंजा ), शहबाज शेख मुबारक (वय २९, रा. गंजीपेठ ) यांच्यासह १७ जणांना अटक केली होती. रविवारी दिवसभर पोलिसांनी १७ जणांच्या गुन्हे अभिलेखाची पाहणी केली. यादरम्यान इरफान याच्याविरुद्ध, मानकापूर, सावनेर व गिट्टीखदानमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. गिट्टीखदानमधील प्राणघातक हल्ला प्रकरणात चाचू याच्यासह नौशाद याच्याविरुद्ध मोक्काचीही कारवाई करण्यात आली होती. काडोपे याच्याविरुद्ध उमरेड अडय़ाळ व नागभीडमध्ये शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह गुन्हे दाखल आहे. इरफान व कोडापे या दोघांचे मोआवाद्यांशी संबंध असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळीच आयबी व एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पाचपावली पोलीस ठाणे गाठले. तब्बल चार तास अधिकाऱ्यांनी दोघांची कसून चौकशी केली.