कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मोबाईल हिसकला

नागपूरच्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेड (एसएनडीएल)च्या शहीद चौक कार्यालयावर बुधवारी रात्री हल्लाबोल केला. त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील संगणकांपासून खुर्चाची फेकाफेक करीत एसएनडीएलच्या एका कर्मचाऱ्याला पकडून धक्काबुक्की केली. त्याचा मोबाईल हिसकला. हा प्रकार बघत येथील इतर कर्मचारी पळून गेले. घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव निर्माण झाला होता.

नागपूरच्या महाल, गांधीबाग, सिव्हील लाईन या तीन विभागात वीज वितरण करण्याची जबाबदारी एसएनडीएल फ्रेंचाईझीकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीबाग विभागातील मस्कासाथ भागात दोन महिन्यापूर्वी एक भूमिगत केबल भ्रष्ट झाला होता. त्यावेळी या केबलवरील विजेचा लोड इतर ट्रांसफार्मरवर कंपनीकडून वळवण्यात आला होता. परंतु उन्हाळ्यात शहरातील तापमान वाढल्याने ग्राहकांकडून कुलरसह विविध उपकरणांवर विजेचा वापर वाढला. तेव्हा एका ट्रांसफार्मरवर लोड वाढल्याने या भागात वारंवार ट्रांसफार्मर ट्रिप होणे, फ्युज उडणेसह वेगवेगळी तांत्रिक कारणामुळे वीज खंडित व्हायला लागली. एसएनडीएलवर ग्राहकांचा रोष वाढत असल्याने येथील केबल बदलण्याचे काम फ्रेंचाईझीकडून हाती घेतल्या गेले.

परंतु या कामात संशय व्यक्त करीत नगरसेविका आभा पांडे यांनी नियोजित कामाची सगळी माहिती लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनाही सांगण्याची गरज असल्याचे कंपनीला कळवले. त्याशिवाय त्यांनी येथे काम करण्यास मज्जाव केला. त्यामुळे कंपनीकडून भूमिगत केबल बदलण्याचे काम अध्र्यातच सोडून दिले गेले. या केबलची दुरुस्ती न झाल्याने एकाच ट्रांसफार्मरवर लोड वाढून या भागात अघोषित भारनियमन सुरू झाले. वीज ग्राहकांकडून तक्रारींचा पाऊस सुरू झाला. ग्राहकांनी एसएनडीएल कार्यालय गाठले असता त्यांच्याकडून नगरसेविकांनी काम थांबवल्याचे सांगितल्या जाऊ लागले. ही माहिती नगरसेविकांपर्यंत पोहोचली. वारंवार वीज खंडित होऊन ग्राहकांना होणारा त्रास बघत सुमारे दीडशे जणांसह नगरसेविकांनी बुधवारी रात्री शहीद चौक गाठले.

एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून शहीद चौक कार्यालयात बोलावण्यात आले. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बघत संतप्त जमावाने अचानक येथील खुर्चासह विविध वस्तूंची फेकाफेक सुरू केली. हा प्रकार बघून येथील काही कर्मचारी पळून गेले. परंतु एका ऑपरेटरला जमावाने पकडून त्याच्या जवळील मोबाईल हिसकला. त्याची गच्ची पकडून धक्काबुक्की केली. या घटनेमुळे रात्री १ वाजेपर्यंत परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा एसएनडीएलचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षाने वेगवेगळी कारणे पुढे करीत गुरुवारी तहसील पोलीस ठाण्यात एकामेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या. दोन्ही पक्षांसोबत पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकी घेतल्या. परंतु या घटनेचे कारण पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे.

जमाव विशिष्ट उद्देशानेच आले होते

नगरसेविकांच्या भागात ग्राहकांना मोबाईलवर एसएमएसने सूचना देऊन शटडाऊन दुरुस्तीकरिता घेण्याची सूचना दिली होती. परंतु त्यानंतर येथे वीज गेली नसताना नगरसेविकांसह जमावाकडून रात्री उशिरा आंदोलन केल्या गेले. एसएनडीएल ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याकरिता कटिबद्ध असून नगरसेविकांनी मागणी केल्यास तेथे ग्राहक तक्रार निवारण शिबीर घेतले जाईल, अशी माहिती एसएनडीएलच्या जनसंपर्क विभागाकडून दिल्या गेली.

एसएनडीएलकडून नियमबाह्य़ कामे सुरू

एसएनडीएलकडून या भागात नियम धाब्यावर बसवून केल्या जाणाऱ्या खोदकामात येथील पाण्याची लाईन, सिव्हर लाईन बऱ्याचदा तोडल्या गेली. नागरिकांना होणारा त्रास बघता त्याचे काम नगरसेविका म्हणून महापालिकेच्या खर्चातून मी करवून घेतले. नागरिकांमध्ये एसएनडीएलच्या विरोधात असलेला रोष व सरकारी संपत्तीचे होणारे नुकसान बघता फ्रेंचाईझीने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करायला हवी. परंतु तेही केली जात नाही. सोबत फ्रेंचाईझीच्या निकृष्ट सेवेमुळे या भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाने माहिती न देता वीज खंडित केली जाते. तेव्हा संतप्त नागरिकांनी बुधवारी रात्री एसएनडीएलचे शहीद चौक कार्यालय गाठले. नागरिकांनी बोलावल्यावरही एसएनडीएलचे अधिकारी घटनास्थळी न पोहचल्याने रात्री जमावाकडून आंदोलन झाले.

– आभा पांडे, नगरसेविका, नागपूर