दुचाकी चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली असली तरी त्याच्या हाताळणीचा प्रश्न आता ऐरणीवर येऊ लागला आहे. शहरातील काही मल्टिप्लेक्समध्ये हेल्मेट नेण्यास मनाई असल्याने चित्रपट प्रेक्षकांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, याच मुद्दय़ावरून रसिक आणि मल्टिप्लेक्सच्या कर्मचाऱ्यांत वादविवादाच्या ठिणग्या उडू लागल्या असून, हे प्रकरण सीताबर्डी पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

सीताबर्डी येथील एका मल्टिप्लेक्समध्ये गुरुवारी ही घटना घडली. आपल्या मुलीबरोबर चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका पालकाला चित्रपटगृहात हेल्मेट घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. हेल्मेट बाहेरही ठेवू दिले नाही. त्यामुळे महागडी तिकिटे खरेदी करूनही हे पिता-पुत्री चित्रपट पाहू शकले नाही. यातून वाद झाल्याने संबंधितांनी मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

एकाएकी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने कारवाईचा जाच चुकविण्यासाठी वाहनधारकांनी मिळेल तेथून हेल्मेट खरेदी करणे सुरू केले. एकाच वेळी लाखो हेल्मेट विकले गेले. आता त्याच्या हाताळणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरन्ट, मॉल्स, दवाखाने, बाजारपेठांमध्ये हाती हेल्मेट घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. नाटय़गृहे, चित्रपट गृहातही हेल्मेट ठेवायचे कुठे हा प्रश्न येतोच.

यातच मल्टीप्लेक्समध्ये मनाई केल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची आहे, हेल्मेट आतमध्ये नेता येत नसेल तर त्यांनी ते बाहेर ठेवण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे, मात्र निव्वळ हेकेखोरपणा करून नागरिकांना त्रास देणे सुरू आहे .

हेल्मेटसक्तीच्या संदर्भात ग्राहक पंचायतने घेतलेल्या चर्चासत्रातही हेल्मेट हाताळणीचा मुद्दा काही महिलांनी उपस्थित केला होता. दुचाकीवर जाताना मुलांना सांभाळायचे की हेल्मेट? असा सवाल त्यांनी केला होता. आता त्याची प्रचिती येऊ लागली आहे.

‘हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था व्हावी’

शहरात हेल्मेट सक्ती असल्याने बाहेर पडताना ते बरोबर असणे अपरिहार्य आहे. मुलीसोबत बर्डीच्या मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेलो असता तेथील कर्मचाऱ्याने हेल्मेट हातात घेऊन आत जाण्यास मनाई केली, हा त्यांचा नियम असेल तर त्यांनी वेगळी व्यवस्था करणे गरजचे होते, तसे त्यांनी केले नाही आणि हेल्मेट बाहेरही ठेवू दिले नाही, चित्रपट पाहायला अनेक जण दुचाकीने येतात, त्यांच्याकडे हेल्मेट असतेच, एक तर व्यवस्थापनाने ते आतमध्ये सोबत नेऊ द्यावे किंवा बाहेर ठेवण्याची व्यवस्था करावी, असे मनोज जोशी यांनी सांगितले.