न्या. भूषण धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

नागपूर : विविध खटल्यांच्या निकालानंतर वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बाहेर न्यायपालिकेवर आक्षेप घेणारे वक्तव्य टाळावे. न्यायालयीन अधिकारीच न्यायपालिकेसंदर्भात चुकीचे वक्तव्य करत असतील तर तो न्यायपालिकेचा विश्वासघात व अवमान ठरतो, असा हितोपदेश उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी यांनी वकिलांना केला.

नागपूर खंडपीठाच्या वतीने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन उच्च न्यायालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. धर्माधिकारी बोलत होते. यावेळी न्या. वासंती नाईक आणि न्या. सुनील शुक्रे प्रामुख्याने उपस्थित होते.

न्यायपालिका ही कायदे करीत नाही किंवा कायद्याची अंमलबजावणी करीत नाही, तर कायदेमंडळाने तयार केलेल्या कायद्यांच्या आधारावर वादाचे निराकरण करते. न्यायपालिका ही स्वत:हून काही करू शकत नाही. तसे बंधन घटनेनेच न्यायपालिकेवर घातले आहे. अनेकदा प्रलंबित प्रकरणांसाठी न्यायाधीश व वकिलांना जबाबदार धरले जाते. तसेच त्यांच्या सुटय़ांचा मुद्दा देखील उपस्थित केला जातो. लोकांना न्यायालय सकाळी १० ते सायंकाळी ४.३० दरम्यान काम करताना दिसते. मात्र, न्यायालय सुटल्यानंतर न्यायाधीश व वकील दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी रात्रभर जागून जवळपास दिवसभरात १७ ते १८ तास काम करीत असतात. त्यांच्यावरील कामाचा किती ताण आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. ही बाब देखील आता समाजासमोर आणणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानातील योगदान’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.