केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून या योजनेमुळे समाजातील गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री  जनआरोग्य योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड  राज्यातील रांची येथे झाले असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षपण नागपुरातील  कार्यक्रमात दाखवण्यात आले. देशातील सुमारे दहा कोटी कुटुंबांना  वार्षिक पाच लाख रुपयाचे आरोग्य विमा कवच मोफत उपलब्ध होणार असून सुमारे ५० कोटी लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेमध्ये सफाई कामगार, घरकाम करणारे कामगार, गठई कामगार, गवंडी, हातमाग कामगार, वेटर अशा विविध गरीब समाजघटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, अशी माहिती गडकरींनी  यावेळी दिली. या योजनेबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक  तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य यांनी त्यांच्या क्षेत्रात, प्रभागात तसेच गावांमध्ये जनजागृती निर्माण करून शासकीय यंत्रणेद्वारे या योजनेचा लाभ गरिबातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले. नागपूर जिल्ह्यत नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतर्फे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचे  कार्यान्वयन होणार असून नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व डागा स्मृती महाविद्यालयाचा तसेच महापालिकेची रुग्णालये यांचा या योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी दिली.

योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल,  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल,  स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित  होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushman bharat yojana nitin gadkari
First published on: 25-09-2018 at 01:12 IST