देवेंद्र गावंडे

कर्मयोगी बाबा आमटेंनी उभारलेले आनंदवन म्हणजे माणुसकीला लागलेली शारीरिक आणि मानसिक अस्पृश्यतेची जखम धुऊन काढणारी गंगोत्रीच. हातपाय गळून पडलेल्या कुष्ठरुग्णांच्या वाटय़ाला येणारी उपेक्षा बघून अस्वस्थ झालेल्या बाबांनी दगडधोंडय़ाच्या भूभागाला अपार कष्टाने आकार देत आनंदवनाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. माणसामाणसांत भेद करायचा नाही, ही बाबांची शिकवण. तब्बल सात दशकांचा प्रवास अनुभवणाऱ्या या आनंदवनात आता या शिकवणुकीलाच तडा जातो की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे. कार्यकर्त्यांचा छळ, त्यांच्याबाबतीत होणारी मनमानी, आरोप, प्रत्यारोप त्यातून उद्भवलेले आमटे कुटुंबातील वाद यामुळे आनंदवन चर्चेचा विषय ठरले आहेच, शिवाय कॉर्पोरेट होण्याच्या नादात अनेक जुन्या प्रकल्पांना लागलेले कुलूप आणि यातून आलेल्या अस्वस्थतेमुळे या प्रकल्पातील माणुसकीची वीणच उसवली आहे.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

बाबा आणि ताईंनी १९४९ मध्ये या आनंदवनाची उभारणी करताना ते केवळ कुष्ठरुग्णांवर उपचार करणारे केंद्र अथवा रुग्णालय होऊ नये, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यांचे स्वप्न होते कुष्ठरोग्यांच्या श्रमातून उभ्या राहणाऱ्या कृषी आणि औद्योगिक वसाहतीचे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या स्वप्नाला आकार दिला आणि श्रमशक्तीचे केंद्र म्हणून आनंदवन मोठय़ा दिमाखात नावारूपाला आले. हे करताना बाबांनी, आनंदवन देशभरातील तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र राहील तसेच राज्य आणि देशातील सांस्कृतिक क्षेत्रसुद्धा याला जोडले जाईल याची दक्षता घेतली. समाजाचा जाच सोसणाऱ्या कुष्ठरुग्णांना इतके स्वयंपूर्ण करायचे की कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना पुन्हा समाजाकडे हात पसरावे लागू नयेत, याची खबरदारी बाबांनी घेतली. त्यामुळेच मीठ आणि साखर वगळता साऱ्या वस्तू आनंदवनात तयार होऊ लागल्या. आज ७० वर्षांनंतर आणि विशेषत: बाबांच्या निधनानंतर स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता या तीर्थस्थळाचा साधा फेरफटका मारला तरी तेव्हाचे आनंदवन हेच का, असा प्रश्न कुणालाही पडावा.

बाबांच्या स्वप्नातून उभे राहिलेले अनेक उपक्रम आता बंद पडले आहेत अथवा त्यांना घरघर तरी लागली आहे. १९६७ मध्ये बाबांनी श्रमसंस्कार छावणी सुरू केली. सोमनाथच्या या शिबिरातून देशभरातील हजारो तरुण घडले आणि समाजकार्यात सहभागी झाले. नव्या व्यवस्थापनाने या शिबिरासाठी शुल्क आकारायला सुरुवात केली आणि हळूहळू तरुणाईचा ओघ आटत गेला. यंदा करोना संकटामुळे हे शिबीर झाले नाही. तरीही दरवर्षी होणाऱ्या या शिबिराची पार रया गेली असेच लोक बोलतात. बाबांच्या काळात या शिबिरात तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव यांच्यासारखे दिग्गज यायचे. आता आनंदवनातील कर्मचारी आणि कार्यकर्ते तेवढे तेथे भाषणे देताना दिसतात. थोरांची उपस्थिती केव्हाच हद्दपार झाली. आनंदवनचा मित्रमेळावा हे तेव्हा राज्यच नाही, तर देशाचे आकर्षण होते. पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, राहुल बारपुते, न्या. धर्माधिकारी, राम शेवाळकर यांच्यासारखे अनेक साहित्यिक आणि कलावंत देशभरातून या मेळाव्याला हजेरी लावायचे. बाबा जाताच हे मेळावे थांबले. ते सुरू राहावेत, यासाठी नव्या पिढीने साधे प्रयत्नसुद्धा केले नाहीत. ‘आनंदवन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. नाममात्र शुल्क आकारणी करूनसुद्धा श्रमसंस्कार शिबिराला होणारी गर्दी कायम आहे. त्यात एक वर्षीचा अपवाद वगळला तर नेहमी बाहेरच्या नामवंतांनाच मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. मित्रमेळावे बंद झाले हे खरे आहे, पण आनंदवनाची पंचाहत्तरी आणि हेमलकसाच्या पन्नाशीनिमित्ताने ते सुरू करण्याचा विचार आहे, असे त्या म्हणाल्या.

उद्योग-उत्पादने बंद

कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची. त्यांची तडाखेबंद विक्रीही होत असे. येथील ‘टीनकॅन’ प्रकल्पात तयार होणाऱ्या चाळण्या, गाळण्या आजही अनेकांच्या घरी असतील. आता हा प्रकल्प रखडत रखडत सुरू आहे. आनंदवनच्या सतरंज्या, चादरी, टॉवेल, बैठकीचे जाजम यालाही खूप मागणी असे. आता ही उत्पादने नाहीशी झाली आहेत.

नव्या व्यवस्थापनाने जुने पॉवरलूम मोडीत काढत कोटय़वधी रुपये खर्चून नवे आधुनिक पॉवरलूम आणले. त्यावर काम करण्यासाठी बाहेरचे कारागीर आनंदवनात आणले गेले, हा संस्थेसाठी धक्काच होता. या प्रकल्पात जे तयार होईल ते कुष्ठरुग्णांच्या हातचेच असेल, हा आजवर कटाक्षाने पाळला गेलेला नियम पायदळी तुडवला गेला. मुळात या संस्थेला जागा मिळाली ती कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी. त्यामुळे त्यांनाच सोबत घेऊन प्रकल्पाची आखणी करणे नियमाला धरून होते. बाहेरच्या कारागिरांमुळे त्यालाच हरताळ फासला गेला. चामडय़ांचा उद्योग हाही एकेकाळी आनंदवनचे आकर्षण होता. त्यातून तयार होणाऱ्या चपला, जोडय़ांना चांगली मागणी असे. हा प्रकल्प सांभाळणाऱ्या कारागिरांचा वेतन आणि घरभाडय़ावरून वाद झाला. आधी असे वाद चर्चेतून सहज सोडवले जायचे. नव्या व्यवस्थापनाने याकडे लक्षच दिले नाही. परिणामी कारागीर सोडून गेला आणि उद्योग बंद पडला. लाकडी कपाटे, लोखंडी साहित्य, बुकशेल्फ कधीच हद्दपार झाले. ही सर्व उत्पादने आनंदवनाला आर्थिक उभारी देणारी होती.

शेतीची ठेकेदारी..

येथे होणारी शेती ही साऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. सोमनाथ प्रकल्प तर धान्याचे कोठार म्हणूनच ओळखला जात असे. येथे पिकणारे धान्य, भाजीपाला यातून आनंदवनाची गरज तर भागायचीच, परंतु उर्वरित माल बाजारात विकला जायचा. आता त्यातील बरीचशी शेती ठेक्याने करायला आंध्रमधील शेतकऱ्यांना दिली जाते. शासनाने ही शेती आनंदवनला दिली ती कुष्ठरुग्णांना आत्मनिर्भर होता यावे म्हणून. नियमाप्रमाणे ती ठेक्याने देता येत नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मोठमोठे तलाव हे येथील शेतीचे वैशिष्टय़. आता त्या तलावांकडे दुर्लक्ष झाले आहे आणि त्यातले मत्स्यउत्पादनसुद्धा थांबले आहे. एकेकाळी आनंदवनचे दूधदुभते साऱ्या वरोरा शहराची गरज भागवायचे. रोज तेराशे लिटर दुधाचे उत्पादन व्हायचे. आता हे उत्पादन शंभर लिटरवर आले आहे. अर्थात शीतल करजगी यांनी हे सारे आरोप नाकारले. पॉवरलूमचा प्रयोग गौतमच्या पुढाकाराने सुरू झाला आणि तो यशस्वीरीत्या चालवला जात आहे. शेतीचे उत्पन्न कमी झाल्याचा दावाही त्यांनी खोडून काढला. गौतमच्याच पुढाकाराने ५३४ झाडांची फळबाग उभारली गेली. शेती करण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवले गेले. बाबांनी सुरू केलेले कुठलेही उद्योग बंद केलेले नाहीत. प्रत्येक ठिकाणी थोडय़ाफार कुरबुरी असतात. त्यावर लगेच तोडगा काढला जातो. नव्याने उभारलेला पॉवरलूम प्रकल्पसुद्धा व्यवस्थित सुरू आहे. त्यावर काम करण्यासाठी कुशल कारागीर तयार होईपर्यंत बाहेरचे लोक आणले तर त्यात काय वाईट, असा सवाल करजगी यांनी केला. नवे बदल घडवून आणताना जुन्या चौकटी मोडल्या तर काय वाईट, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शेती ठेक्याने देण्याच्या प्रश्नावलीतील मुद्दय़ावर मात्र त्या बोलत नाहीत.

आस्था, वात्सल्याचा लोप!

बाबांच्या पश्चात डॉ. विकास आमटे या संस्थेचे सचिव झाले. त्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी वाढल्यानंतर त्यांची महत्त्वाकांक्षी मुलगी डॉ. शीतल आमटे-करजगी आणि तिचे यजमान गौतम करजगी यांच्या हाती संस्थेचा कारभार गेला. या करजगींना आनंदवनाच्या अंतर्गत कारभाराचे व्यवस्थापकपद देण्यात आले. डॉ. विकास यांचे चिरंजीव कौस्तुभ हे आधी सहसचिव म्हणून संस्थेचा कार्यभार सांभाळायचे. अचानक एक दिवस त्यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवून त्यांना पदावरून तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळातून काढून टाकण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेचा कारभार योग्य पद्धतीने चालवणारे कौस्तुभ आता कुठे राहतात, काय करतात याविषयी आनंदवनात कुणीच बोलत नाही. महत्त्वाचे म्हणजे हेमलकसाचा प्रकल्प अतिशय निष्ठेने चालवणारे डॉ. प्रकाश आमटे आनंदवनाच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत. गेल्या १५ वर्षांत ते मंडळाच्या एकाही बैठकीला हजर राहिले नाहीत. आनंदवनात येण्याचे ते शक्यतो टाळतात असाच आजवरचा अनुभव आहे. परिणामी, या संस्थेत एकेकाळी जाणवणारी आस्था, वात्सल्य, कौटुंबिक जिव्हाळा या साऱ्या आवश्यक गोष्टी नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वी प्रेमाने येणारेही आता राहिले नाहीत. येतात ते केवळ बाबांचे भक्त आणि यात्रेकरू.

..तरीही देणग्यांचा ओघ कायम

आनंदवनची अवस्था विदारक असली तरी ही संस्था आर्थिकदृष्टय़ा अद्यापही भक्कम आहे. मुळात या भक्कमतेचा पाया बाबांनीच रचून दिला आणि अजूनही संस्थेला भरपूर देणग्या मिळत असतात. संस्थेची आर्थिक स्वयंपूर्णता सुखावणारी असली तरी येथे राहणारी माणसे मात्र दु:खी आहेत. डॉ. शीतल करजगींना मात्र हे आरोप मान्य नाहीत. विश्वस्तांच्या सभेत संस्थेचा कार्यभार माझ्याकडे सोपवण्याचा निर्णय एकमताने झाला. माझ्या यजमानांनी सुमारे १५ वर्षे कार्पोरेट क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यानंतर ते येथे आले. विश्वस्तांच्या संमतीनेच त्यांना अंतर्गत व्यवस्थापकाची जबाबदारी देण्यात आली. कौस्तुभला काढणे हा संस्थेचा अंतर्गत प्रश्न आहे. आपल्या कार्यकाळात आनंदवनने प्रगतीच केली. आजच्या घडीला येथे तयार होणाऱ्या वस्तूंचा खप दरदिवशी ७० हजारांवर गेला आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तुम्ही केव्हाही येऊन ती पाहू शकता. संस्थेतील आपुलकी, माया, प्रेम यासंदर्भात म्हणाल तर ते प्रत्येकाच्या मानण्यावर आहे, असेही त्या म्हणाल्या. स्वत: कौस्तुभसुद्धा संस्थेतून बाहेर का पडले यावर बोलायला तयार नसतात. मी सध्या पाण्याच्या प्रश्नावर पुण्यात काम सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले. मी प्रकृतीच्या कारणासाठी दूर झालो असलो तरी संस्थेकडे माझे पूर्ण लक्ष असून शीतलने संस्थेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे, अशा शब्दांत डॉ. विकास मुलीची पाठराखण करतात. मात्र कौस्तुभच्या मुद्दय़ावर मौन बाळगतात. मी आनंदवनात फारसा जात नाही, हे डॉ. प्रकाश यांनी मान्य केली. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यांना त्याची जाणीव असते इतरांना नाही, असे सूचक विधान करतानाच नव्या पिढीने समजूतदारपणा दाखवायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेवटी प्रत्येकाची काम करण्याची शैली असते. त्याला काय करणार, असा प्रश्न उपस्थित करतानाच टाळेबंदीनंतर मी आनंदवनात वाद मिटवण्यासाठी जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीच्या नेतृत्वात हेमलकसा प्रकल्प मात्र योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, अशी पुस्तीही डॉ. प्रकाश आमटे यांनी जोडली.

पूर्वार्ध

* बाबा आमटे यांच्या स्वप्नातून उभे राहिलेले अनेक उपक्रम बंद पडले आहेत अथवा त्यांना घरघर तरी लागली आहे.

* कार्यकर्त्यांचा छळ, आरोप, प्रत्यारोपांमुळे आमटे कुटुंबातील वाद यामुळे आनंदवन चर्चेचा विषय ठरले आहे.

* कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची, ती जवळजवळ बंद झाली आहेत.

* कॉर्पोरेट होण्याच्या नादात अनेक जुन्या प्रकल्पांना टाळे लागले आहे. प्रकल्पातील माणुसकीची वीणच उसवली आहे.