News Flash

विदर्भात रामदेव बाबा १५ हजार कोटी गुंतवणार

योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर महाराष्ट्र सरकार मेहरबान आहे.

रामदेव बाबा

नागपूरमध्ये फूडपार्क; काटोलचा संत्रा प्रकल्पही सुरू करणार; नितीन गडकरी यांची माहिती
योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर महाराष्ट्र सरकार मेहरबान आहे. रामदेव बाबांच्या कंपनीला नागपूर व अमरावती येथे फूडपार्क सुरू करण्यासाठी सरकार जागा उपलब्ध करून देणार असून या माध्यमातून ते १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याच बरोबर काटोल येथील बंद पडलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्पही रामदेव बाबांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.
शनिवारी जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
बाबा रामदेव यांची भारतीय जनता पक्षासोबत विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेली जवळीक सर्वश्रूत आहे. त्यातूनच रामदेव बाबांवर महाराष्ट्र सरकार मेहरबान झाले आहे. नागपूर आणि विदर्भाचा औद्योगिक विकास व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करणे आवश्यक आहेत.
ही बाब लक्षात घेऊनच रामदेवबाबाबांना नागपूर आणि अमरावतीत फूड पार्क उभारण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. तसेच काटोल येथील बंद असलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रामदेवबाबा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून विदर्भात १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यापैकी १५०० कोटींचा प्रकल्प नागपुरात उभारला जाणार आहे. प्रकल्पाच्या संदर्भात रामदेव यांनी काही अटी टाकल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यावर हा प्रश्न सोडविला जाईल. याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांना दिल्या.
तत्पूर्वी, गडकरी यांनी त्यांच्या भाषणात रामदेवबाबा सुरू करणार असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाट या भागात मोठय़ा प्रमाणात आयुर्वेदिक वनौषधी आहेत. त्यावर प्रक्रिया करून औषधनिर्मिती करणारे प्रकल्प बाबा रामदेव सुरू करणार असून जागा मिळाल्यास ते रुग्णालयही सुरू करण्यास तयार आहेत.

१५०० कोटींचे नवीन विमानतळ
नागपूर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्यासाठी १५०० कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ाला मान्यता देण्यात आली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर ‘लॉजिस्टिक हब’ च्या प्रस्तावालाही राज्य सकारच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता नागपूरच्या मिहान प्रकल्पाला भरारी मिळण्याची शक्यता आहे. या विमानतळालासुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:57 am

Web Title: baba ramdev invest 15 thousand crore in vidarbha
Next Stories
1 नागपूर महोत्सवाचे विभाजन!
2 वने व वन्यजीव व्यवस्थापनापेक्षाही पर्यटन अधिक महत्त्वाचे
3 ‘झुडपी’च्या पडताळणीत प्रन्यासच्या जागा मुक्त
Just Now!
X