आता नवीन अटी, शर्तीसह आकर्षित करण्याचा प्रयत्न

नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाचा विकास विमानतळासारखा करण्यात येणार होता. मात्र गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने गेल्या पाच वर्षांत परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

नागपूरसह देशभरातील काही प्रमुख रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचे रेल्वेने ठरवले होते. ते काम भारतीय रेल्वेस्थानक विकास महामंडळाकडे देण्यात आले, परंतु गुंतवणूकदारच पुढे आले नाहीत. त्यामुळे रेल्वेस्थानकांचा विकास होऊ शकला नाही. आता रेल्वे मंत्रालयाने पुनर्विकासाच्या काही अटी आणि शर्ती बदलल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मंजुरी मिळाली आहे. आधीच्या अटींमध्ये रेल्वेस्थानक ३५ वर्षांसाठी भाडेपट्टीवर (लिज) देण्यात येणार होते. याशिवाय इतर अटी होत्या. त्या गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकल्या नाहीत. आता ९० वर्षांपर्यंत भाडेपट्टी देण्याचा तसेच उपभाडेपट्टी दिली जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तिसऱ्या किंवा चौथ्या व्यक्तीला भाडेपट्टी देऊ शकणार आहेत. या नवीन अटी आणि शर्तीमुळे गुंतवणूकदार स्थानकांच्या विकासाकरिता पुढे येतील, असा विश्वास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी नागपूर स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु ते काही झाले नाही. मोदी सरकार आल्यानंतर जागतिक दर्जाचे नाव बदलून पुनíवकास करण्यात आला, परंतु मागील पाच वर्षांतही रेल्वेस्थानकाचा विकास झालेला नाही.

अजनी लोको शेड क्रमांक १ वर

अजनी रेल्वेस्थानकावर पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. पुढील टप्प्यात फलाटांच्या संख्येत वाढ करण्यात येईल. तसेच रेल्वेगाडय़ांच्या देखभाल-दुरुस्ती, सफाईची व्यवस्था करण्यात येईल. हे रेल्वेस्थानक दादर आणि कुर्ला स्थानकाप्रमाणे विकसित केले जाणार आहे. अजनी इंजिन दुरुस्ती केंद्र (लोको शेड) हे देशातील क्रमांक १ चे केंद्र आहे. देशात पहिल्यादांचा पुश पूल तंत्रज्ञानाचा वापर रेल्वे इंजिनमध्ये झाला. त्यात अजनी लोको शेडचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या राजधानीमध्ये अशा इंजिनचा वापर होत आहे. यापुढे घाट सेक्शनमधील लोणावळा, इगतपुरी येथे त्याचा वापर केला जाईल. यामुळे वेळीच ३० ते ४५ मिनिटांनी बचत होते, असेही शर्मा म्हणाले.