नागपुरातील डॉ. भुते यांचे संशोधन; अमेरिकेतील जीन बँकेची मान्यता

बासीभात म्हटल्यावर ‘शिळा भात’ असा समज होण्याची शक्यता आहे. मात्र ही वेगळी संकल्पना असून  ती हितकारक आहे. म्हणूनच बासीभातात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांवर संशोधन करून नागपुरातील एका प्राध्यापकाने थेट अमेरिकेतील जीन बँकेचा मूल्यांकन क्रमांक प्राप्त केला आहे. सामान्यत: रात्री शिल्लक राहिलेल्या शिळ्या भाताला सकाळी फोडणी देऊन न्याहरी करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र शिळा भात आणि ‘बासीभात’ यात फरक आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी प्रांतांतील मजुरांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली असून त्यांची पचनक्रियाही कमालीची सुधारलेली असते ती या बासीभातामुळे. आपल्याकडे प्रसूती झालेल्या महिला अडीच-तीन महिने काम करीत नाहीत. मात्र हा भात खाणाऱ्या मजुरांच्या महिला चौथ्या-पाचव्या दिवशी कामे करण्यास तत्पर होतात, कारण बासीभातात वाढणारे सूक्ष्मजीव त्यांना ताकद देत असतात. दही शरीरासाठी उपयोगी असल्याचे आपण म्हणतो, कारण त्यातील आवश्यक बॅक्टेरियांमुळेच.

प्रा. बच्चू ऊर्फ रामदास भुते यांनी नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सूक्ष्मजीवशास्त्रातील पीएच.डी. संपादित केली आहे. ‘बासीभातातील उपयुक्त सूक्ष्मजंतूंवर अभ्यास’, असा त्यांचा विषय होता. अनेक सूक्ष्मजीवांवर अभ्यास केल्यानंतर त्यांच्या १० सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) आणि २ किण्व (ईस्ट) यांना अमेरिकेतील जीन बँकेने मान्यता दिली आहे. वनस्पती किंवा कुठल्याही प्राण्यावर विकसित होणाऱ्या सूक्ष्मजीवांचे संशोधन करून त्यांचा मानवी जगण्यातील उपयोग शोधून काढण्याचे काम अमेरिकेतील जीन बँक करते.

संशोधनासाठी परिश्रम

भुते यांनी केवळ नागपुरातच नव्हे तर विदर्भात ज्या ज्या ठिकाणी आंध्र, छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमधील लोकांच्या वस्त्या होत्या, त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ६० ठिकाणचे बासीभाताचे नमुने संशोधनासाठी गोळा केले. त्यात त्यांना ९३ वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आणि १५ किण्व सापडले. त्यांचा अभ्यास करून त्यांनी बॅक्टेरियाचे नमुने जीन बँकेत पाठवले. त्यात त्यांच्या काही जिवांना मूल्यांकन क्रमांक मिळाला आहे.

बासीभात म्हणजे काय?

रात्री शिल्लक राहिलेल्या भातात पाणी टाकून सकाळी तो गरम न करता खाणे म्हणजे ‘बासीभात’. त्यामुळे पचनशक्ती सुदृढ होते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. देशभरात खाण्यासाठी प्रसिद्ध असलेली इडली, डोसा करतानाही बासीभातासारखीच प्रक्रिया अवलंबली जाते. मात्र नंतर त्याला शिजवून किंवा गरम करून चांगले बॅक्टेरिया मारून टाकतो. त्यामुळे बासीभातातून मिळणारे आहार मूल्य इडली, डोसा यातून शरीराला मिळत नाहीत.

तर भूकबळी आटोक्यात येतील

बासीभातावर आता आपल्या देशात आणि अमेरिकेतही संशोधन सुरू आहे. मला नेहमीच या छत्तीसगडी, आंध्र, पश्चिम बंगालमधून आलेल्या लोकांच्या जीवनशैलीचे कौतुक वाटायचे.  विदर्भात ज्या-ज्या ठिकाणी या लोकांच्या वस्त्या होत्या, तेथून नमुने गोळा करून आणि त्या भागातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यामध्ये एकमेव साम्य असलेल्या ‘बासीभात’ची माहिती मिळाली आणि त्यातील सूक्ष्मजीवांचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे आणखी १० नवीन सूक्ष्मजीव मिळाले आणि अमेरिकेतील जीन बँकेने त्याला मान्यता दिली. या बॅक्टेरियांचे छोटे छोटे पाकीट तयार करून शासनाने ते पुरवल्यास रुग्णांना बरे होण्यास मदत होईल आणि भूकबळीची समस्याही आटोक्यात येईल.  डॉ. बच्चू भुते, सेवानिवृत्त प्राध्यापक, नागपूर विद्यापीठ