सहामहिन्यापूर्वी केलेले रस्तेही उखडले

मुंबईतील रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न सध्या सर्वत्र गाजत असताना उपराजधानीत सुद्धा तिच स्थिती आहे. शहरातील सिमेंट रस्त्यांचा  अपवाद सोडला तर  इतर रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून नागरिक त्यामुळे हैराण झाले आहेत. मंत्र्यांनी खड्डय़ाच्या रस्त्यांनी प्रवास करून बघावा, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

गेल्या आठवडय़ात शहरात दमदार पाऊस झाल्याने रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चार-सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरील डांबर वाहून गेले असून त्याच्यातील गिट्टी बाहेर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. खड्डय़ात पाणी साचले आहे. डांबरी रस्ते चालण्यायोग्य उरले नाही. अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार नागपुरात आहे. फक्त सिव्हिल लाईन्समधील रस्ते गुळगुळीत करण्यात आले असून इतर रस्त्यांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या वर्धा मार्गावरील निम्मा रस्ता मेट्रोने ताब्यात घेतला असून उर्वरित रस्त्याचे या कामामुळे बेहाल झाले आहे. या मार्गावरून चोवीस तास जड वाहनांची वाहूतक सुरू असते.

अनेक अपघात झाले आहे. मात्र, कोणीच लक्ष देत नाही. प्राईड हॉटेलपुढील मेट्रोने तयार केलेल्या रस्त्यावर इतके खड्डे आहेत की तेथून वाहन चालवणेच अशक्य आहे. अनेक लहान मुले तेथून जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहने तेथे घसरता.

मात्र, मेट्रोचे त्याकडे दुर्लक्ष असून मेट्रो प्रशासन व लोक प्रतिनिधी केवळ त्यांच्या कामाचाच गवगवा करण्यात मश्गूल असल्याने नागरिक संतप्त आहेत. हिंगणा रोड, रिंग रोड, अंबाझरी मार्गावरील विवेकानंद पुतळ्याजवळील भाग खड्डय़ात गेले आहेत.

महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी  दर सहा महिन्यांनी त्यांच्या निविदा काढल्या जातात. दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केल्यानंतरही रस्त्यांची अशी दुर्दशा होण्यास खड्डय़ातील अर्थकारण कारणीभूत असल्याचे दिसून येते. ग्रेट नाग रोड , मेडिकल, रेशीमबाग, वर्धमाननगर, इतवारी, महाल परिसरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर डांबरी रस्त्यावर असलेले खड्डे तर अपघाताला आमंत्रण देणारे आहेत.

रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत नागपूर महापालिकेने ३२ कोटीं रुपये खर्च केले आहेत. परंतु, रस्त्यांवरील खड्डय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या कंत्राटदारांकडे डांबरी रस्त्याची कामे दिली, त्याने कशी कामे केली हे कोणीच बघत नाही.

शहरातील विविध भागातील डांबरी रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वीच बुजवण्यात आले आहेत. आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात रस्ते खराब झाले असले तरी ते संबंधित कंत्राटदारांच्या माध्यमातून दुरुस्त केले जात आहेत. शिवाय त्यांची देयके रोखून ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. ज्या ठिकाणी डांबरी रस्ते खराब झाले आहे, त्या ठिकाणी सिमेंट रस्ते तयार केले जात आहेत आणि ते काम प्रगतिपथावर आहे.    – मनोज तालेवार, शहर अभियंता