वाहतूक सुरळीत करण्यासाठी डांबरी रस्त्यावर पांढरे रंगाचे पट्टे रंगवण्यात आहेत, मात्र पट्टे रंगवणारे आणि रस्ते दुरुस्ती यांच्यात ताळमेळ असल्याचे दिसत नाही. रस्त्यावरील खड्डे न बुजताच रस्ते रंगवण्याचे काम सुरू झाले आहे.

पूर्व नागपुरातील उमरेड रोड, शीतला माता मंदिर ते हसनबाग चौकापर्यंतच्या डांबरी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा ओढण्यात आल्यात आहेत. याशिवाय खरबी चौक, रिंग रोड ते हसनबाग चौकापर्यंत पट्टे रंगवण्यात आले आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी डांबर उखडले आहे. रस्त्यांवरील खड्डय़ामुळे आणि खोदकाम बुजवल्यानंतर तयार झालेल्या गतिरोधकामुळे अपघात होत आहेत. खड्डय़ातून दुचाकी वाहने उसळल्याने कंबर, पाठदुखीचे त्रास दुचाकी चालकांना होत आहेत. यामुळे हे खड्डे, गतिरोधक आधी काढणे अपेक्षित आहे, परंतु ते करणे सोडून पट्टे रंगवण्यात येत आहेत. महापालिका पट्टे रंगवण्याचे काम करीत आहे. मात्र, खड्डे बुजवत नाही. महापालिकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यांमधील समन्वयाचा अभाव यातून दिसून येतो.

खड्डे बुजवण्याचे काम एका खात्याकडे आणि रस्त्यावरील पट्टे रंगवण्याचे काम दुसऱ्या खात्याकडे आहे. गेल्या दोन आठवडय़ापासून रंगोटी काम सुरू आहे. यामुळे या भागातील वाहतूक किती सुरळीत झाली हे सांगणे कठीण आहे, परंतु ‘झोन पार्किंग झोन’मध्ये दुचाकी वाहने ठेवल्यास ते उचलणे नेणे सोपे झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली.

‘‘शहर वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून रस्त्यांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम सुरू आहे. ओबडधोबड किंवा खराब रस्त्यावर पट्टे मारले जाऊ शकत नाही. खड्डे असलेल्या रस्त्यावर पट्टे कसे मारले जात आहेत, हे बघावे लागेल.’’    – आसाराम बोदिले, उपअभियंता, वाहतूक विभाग, नागपूर महापालिका.