पालकमंत्र्यांचा जनसंवाद कार्यक्रम; भाजप पदाधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची महिलेची तक्रार

नेहरूनगर उद्यानात सोमवारी भर दुपारी आयोजित पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमात व्यासपीठावरील महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाठी कुलरची व्यवस्था तर ज्यांच्यासाठी हा  कार्यक्रम घेतला त्या जनतेसाठी पुरेशा पंख्यांचीही व्यवस्था नसल्याने ती उकाडय़ाने त्रस्त झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, एका प्राध्यापकाच्या पत्नीने भाजप पदाधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली व न्यायासाठी दाद मागितली.

उपराजधानीत गेल्या काही तापमानात वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था करणे अपेक्षित होते. महापालिकेने मंडप टाकला होता. व्यासपीठावर बसणारे पालकमंत्री, महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी दोन कुलर लावले होते.  मंडपात केवळ आठ ते दहाच पंखे लावले होते. याचा वारा सर्वांपर्यंत पोहोचतच नव्हता. नागरिकांना उकाडय़ाचा चांगलाच मन:स्ताप झाला. महापालिकेने अतिरिक्त पंखे का लावले नाहीत? असा प्रश्न नागरिकांनी केला. एका नागरिकाने पिण्यासाठी पाण्याची सोय करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली.

यावेळी मंजूषा फाले या महिलेने भाजप पदाधिाकरी प्रकाश वाढरेने जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला. तिचे पती प्राध्यापक असलेल्या शिक्षण संस्थेत हा पदाधिकारी लिपिक आहे. त्याने प्राध्यापकाच्या मुलाला चांगल्या संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी १.७५ लाख रुपये घेतले होते. प्रवेश मिळाला नसल्यावर त्याला पैसे परत मागण्यात आले. परंतु ते न देता हा पदाधिकारी भाजपचे नेते गडकरी, फडणवीस यांचे नाव सांगत जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप महिलेने केला. या प्रकाराने तिच्या पतीची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखलही केल्याचे तिने सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला तेथे बोलावण्याची सूचना संबंधितांना दिली.

वयैक्तिक तक्रारीने दमछाक!

जनसंवादात दोन गटातील वैयक्तिक तक्रारींमुळे प्रशासनाची दमछाक झाली. पालकमंत्र्यांनी सुरुवातीला तातडीने कारवाईच्या सूचना केल्या, परंतु थोडय़ाच वेळात हा वैयक्तिक वाद असल्याचे स्पष्ट झाले. एका मुलीने कौटुंबिक वादात मारहाण होत असल्याची तक्रार केली. पोलीस कारवाई करीत नसल्याचा दावा केला. दोन शेजाऱ्यांमध्ये व्यावसायिक वाद होता. त्याची तक्रारही येथे करण्यात आली. शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी परस्परांवर अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावर आरोप केले. एका महिलेने तिचा सून छळ करते, अशी तक्रार केली. सर्व प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून योग्य कार्यवाहीची सूचना शेवटी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्याही सूचनेकडे दुर्लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ सौंदर्यीकरणाबाबतची सूचना केली  होती. महापालिकेला प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. दीड वर्षांपूर्वी पालकमंत्र्यांनी नंदनवन येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या विकासाबाबत आराखडा तयार करण्याबाबतच्या सूचना दिल्या. परंतु अद्याप हा प्रस्तावच संबंधित यंत्रणेकडे सादर झाला नाही, अशी व्यथा आमदार कृष्णा खोपडे यांनी मांडली. त्यावर तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

फलकावर विरोधी पक्षनेत्याचे छायाचित्र

धरमपेठ झोनमध्ये काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालत जनसंवाद कार्यक्रमातील फलकावर विरोधी पक्षानेत्यांचे छायाचित्र नाही, महापालिका आयुक्तांचे नाव नाही, याकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत नेहरूनगरच्या कार्यक्रमातील मंचावरील फलकावर विरोधी पक्षनेते तानाची वनवे यांचे छायाचित्र झळकत असल्याचे चित्र होते.