बसपा प्रदेशाध्यक्षांची टीका

महाराष्ट्रात विविध गटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षाचे काही नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या दावणीला बांधले असून त्यावरच त्यांचे पोटपाणी चालते, अशी घणाघाती टीका बहुजन समाज पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केली.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर साखरे यांनी प्रथमच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपाइं नेत्यांवर टीका केली. हे नेते कधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी भाजप-शिवसेनेबरोबर जातात. त्यांच्या अशा राजकारणामुळे दलित समाज त्यांना ओळखून आहे, त्यांनी पत गमावली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे स्वयंघोषित नेते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा त्यांना लाभला आहे. त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली असती तर समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते, परंतु ते एका जिल्ह्य़ापुरते (अकोला) मर्यादित राहिले आहेत. रामदास आठवले हे संधीसाधू नेते आहेत, असे साखरे म्हणाले. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही पक्षांनी ७० वर्षांत जे करून दाखवले नाही, ते बसपा केंद्रात आल्यावर करून दाखवेल, असे त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव संघाचे षडयंत्र

भीमा-कोरेगाव घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे षडयंत्र आहे. राज्यात मराठा मोर्चा, बहुजन मोर्चा शांततेत निघाले. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यास या देशात आपले काही खरे नाही. या भीतीने संघ आणि भाजपने दोन समाजात दरी निर्माण करण्यासाठी हे प्रकरण घडवून आणले, असा आरोपही साखरे यांनी केला.

ईव्हीएममुळे भाजप विजयी

काँग्रेस सत्तेत असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार केला जाऊ शकतो, असे प्रात्यक्षिकांसह सांगत फिरत होते. आता सत्तेत आल्यावर त्यांना तेच मतदान यंत्र निर्दोष असल्याचा साक्षात्कार झाला, असा आरोप साखरे यांनी केला.