तीन महिन्यांपासून भाडे दिले जात असतानाही उद्घाटन नाही

सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी आणि राणाप्रतानगर पोलीस ठाण्यांतील काही क्षेत्र तोडून बजाजनगर पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात ठाणे सुरू करण्यासाठी तीन वर्षांच्या भाडेपट्टीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस) परिसरात सुरेंद्रनगरातील एक बंगला घेण्यात आला. तीन महिन्यांपासून घरमालकाला महिन्याला एक लाख रुपयेप्रमाणे भाडे देण्यात येत आहे. मात्र, अद्यापही पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले नाही. पोलीस ठाण्याचे उद्घाटन न होण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळत नसल्याचे सांगण्यात येत असून पोलीस अधिकारीही मुख्यमंत्र्यांविना पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्यावर आहे. गुन्हेगारी रोखायची असल्यास पोलिसांनी लोकांपर्यंत पोहोचावे, अशी भावना विद्यमान पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनीही व्यक्त केली. दिवसेंदिवस नागपूर शहराचा विस्तार होत आहे. मात्र, पोलीस ठाणे तेवढीच होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस ठाण्यांच्या निर्मितीवर भर दिला. त्यानुसार नागपुरात शांतीनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर बजाजनगर पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला असून बेसा बेलतरोडी पोलीस ठाणे प्रस्तावित आहे.

बजाजनगर पोलीस ठाण्याशी सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी आणि राणाप्रतानगर पोलीस ठाण्यातील काही भाग संलग्नित करण्यात आला आहे. शिवाय बजाजनगर पोलीस ठाण्यात येणारा बहुतांश भाग हा उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. शिवाय शहरातील अनेक बडे नेते याच भागातील आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. हे पोलीस ठाणे तात्काळ सुरू करता यावे म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी मोठय़ा वेगाने हालचाली केल्या. सुरेंद्रनगर येथील घाडगे यांचा रिकामा बंगला एक लाख रुपये महिनाप्रमाणे तीन वर्षांसाठी घेतला. पोलीस ठाण्यासाठी एस. पी. नंदनवार यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ७६ पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु, अद्यापही पोलीस निरीक्षक वगळता एकही अधिकारी व कर्मचारी देण्यात आलेला नाही. पोलीस ठाण्याचे उद्घाटन होत नसल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदनवार यांच्याकडे सध्या इमामवाडा पोलीस ठाण्याचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अद्यापही थंडबस्त्यात पडल्याचे दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांचा मुहूर्त पोलिसांना सापडत नसल्याने ठाण्याचे उद्घाटन रखडले आहे. आता उद्घाटनाला कोणता मुहूर्त सापडतो, असा सवाल विचारण्यात येत आहे.

लवकरच ठाण्याचे उद्घाटन

डान्स पोलीस ठाण्यासाठी आवश्यक इमारत भाडय़ाने घेण्यात आली आहे. मनष्युबळ निश्चित करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणी येत असल्याने पोलीस ठाण्याचे उद्घाटन लांबले. मात्र, लवकरच उद्घाटन करण्यात येईल.

संतोष रस्तोगी, पोलीस सहआयुक्त