चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाची साथ आता शहरातून गावखेडय़ापर्यंत गेली असून भटक्या व विमुक्त बंजारा समाजाचे विदर्भातील सुमारे २० हून अधिक तांडे यामुळे बाधित झाले आहेत. दरम्यान मुंबई बाधित झाल्याने तेथून तांडय़ावर परतलेले मजूर येथेही आता उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत.

विदर्भात यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्य़ात बहुसंख्येने बंजारा समाज आहे. एकटय़ा यवतमाळ जिल्ह्य़ात तांडय़ाची संख्या साडेचार ते पाच हजार आहे. त्याखालोखाल वाशीम जिल्ह्य़ात तांडे आहेत. या तांडय़ावरील अनेक लोक रोजगारासाठी मुंबई-पुण्यात जातात. तेथे करोनाची साथ पसरल्याने टाळेबंदीच्या काळात हे मजूर त्यांच्या तांडय़ावर परतले. परंतु साथ गावखेडय़ापर्यंत पोहचल्याने तांडेही सुरक्षित राहू शकले नाही. सध्याच्या स्थितीत यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्य़ातील एकूण २० तांडय़ावर करोनाचे रुग्ण सापडले. त्यात पुसद तालुक्यातील सहा, मानोरा व वाशीम प्रत्येकी ३, यवतमाळ जिल्ह्य़ातील ७  आणि मंगरुळपीर तालुक्यातील एका तांडय़ाचा समावेश असल्याचे बंजारा समाजासाठी काम करणाऱ्या तांडा सुधार समितीचे नामा जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, तांडय़ावरील परिस्थिती वाईट आहे. उमरखेड, महागाव, पुसद, मानोरा, मगरुळपीर, वाशीम, दिग्रस, दारव्हा तालुक्यातील तांडय़ावर अशीच स्थिती आहे. आम्ही गावांना भेटी दिल्यावर जनजागृती करतो पण त्यालाही मर्यादा आहेत.

मुंबईहून परतले तांडय़ावरचे कामगार पुन्हा परत जाऊ लागले आहेत. मुंबईतील कंत्राटदार त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना तेथे नेण्यासाठी प्रत्येकी तीन ते चार हजार रुपये तो आकारतो. ट्रकद्वारे तो त्यांना घेऊन जातो. तांडय़ावर रुग्ण आढळल्याने  प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामुळे कोणालाही बाहेर पडता येत नाही. शेतीची कामे, रोजमजुरीवरही जाता येत नाही. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.

यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्य़ातील काही तांडय़ांवर करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ते क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही जण परत रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेत आहेत.’’

– नामा जाधव, मुख्य संयोजक अ.भा. तांडा सुधार समिती