‘मुद्रालोन’मधील १५२.३६ कोटी अनुत्पादित कर्जाचा समावेश; माहितीच्या अधिकारातून उघड

नागपूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध शाखेतील १ लाख ८८ हजार ४१० खात्यातील अनुत्पादित कर्जाची रक्कम (एनपीए) २ हजार १३७.८९ कोटींवर गेली आहे. त्यात मुद्रालोन म्हणून नागरिकांना दिलेल्या एकूण कर्जातील अनुत्पादित कर्जाची म्हणजे थकीत कर्जाच्या १५२.३६ कोटी रुपयांचाही समावेश असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पूणेतील मुख्य कार्यालयाच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत बँकेने ५ लाख ३९ हजार ३३१ खातेधारकांना २ हजार ५६०.३८ कोटी रुपयांचे मुद्रालोन दिले. त्यातील परतफेड न करणाऱ्या मुद्रालोनच्या १२ हजार १७२ खातेधारकांचे अनुत्पादित कर्जाची रक्कम (एनपीए) १५२.३६ कोटी आहे. हे प्रमाण मुद्रालोनमधील एकूण कर्जाच्या तुलनेत ५.९५ टक्के आहे. ३१ मार्च २०२१ रोजी बँकेत जनधन योजनेचे ६८ लाख १४ हजार ८९० खात्यात २ हजार ५४५.१४ कोटी रुपये जमा होते.

२०२०- २१ या आर्थिक वर्षांत ग्राहकांकडून बँकेशी संबंधित आर्थिकसह इतर प्रकारच्या ३ हजार ७६० तक्रारी आल्या. तर रिझव्र्ह बँकेकडे बँक ऑफ महाराष्ट्राशी संबंधित ८२५ तक्रारी ग्राहकांनी केल्या.

या आर्थिक वर्षात बँक किती नफा वा तोट्यात आहे, या प्रश्नाच्या उत्तरात बँकेकडून संबंधित माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. तर या आर्थिक वर्षात बँकेत किती घोटाळे झालेत व त्यात किती कर्मचारी गुंतल्याच्या विषयावर बँकेने ही गोपनीय स्वरूपाची माहिती असल्याचे सांगत माहिती अधिकार अधिनियमकडे बोट दाखवत माहिती देणे टाळले. सोबत वर्षभरात एकाही कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराबाबत कारवाई न केल्याचेही माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना बँकेकडून सांगण्यात आले.

करोनामुळे बँकेतील ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

२०२०-२१ या आर्थिक वर्षांत बँक ऑफ महाराष्ट्रचे ६९८ कर्मचारी निवृत्त झाले. त्यात काही स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांचाही समावेश आहे. तर करोनाच्या कठीण काळात सेवा देताना विषाणूचे संक्रमण होऊन बँक ऑफ महाराष्ट्रचे ३९ कर्मचारी दगावले. तर कामात कुचराई केल्याने १४ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ वा निलंबित केल्याचेही माहितीच्या अधिकारात सांगण्यात आले.