बास्केटबॉल स्पध्रेसाठी महापालिकेचा प्रस्ताव; पूरग्रस्तांना मात्र एक रुपयाचीही मदत नाही

मोठय़ा आर्थिक संकटाशी झुंजणारी नागपूर महापालिका ‘महापौर चषक‘ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पध्रेवर तब्बल ४२ लाखांचा निधी खर्च करीत आहे. यात रंगमंचासाठी १४ लाख तर शाही भोजनावर १७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पध्रेसाठी आवश्यक कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरिता निविदा न काढता खर्च करण्याची परवानगी स्थायी समितीला मागण्यात आली आहे. उद्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीपुढे हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. एकीकडे कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना तिकडे एक रुपयाचीही मदत न करता, ही लाखोंची उधळपट्टी महापालिकेला योग्य वाटते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात १३ आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींची राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धा १७ ते २४ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पध्रेसाठी एकूण ४२ लाख २२ हजार रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेने २५ लाखांची तरतूद केली असली तरी वाढीव खर्चाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी वेळ कमी असल्याने या खर्चासाठी निविदेची अट शिथिल करावी, अशी विनंती क्रीडा विभागाने केली आहे.

नऊ मदानांवर ही स्पर्धा होणार असून १८०० खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. मैदान, व्यासपीठ, ध्वनी यंत्रणेसह तत्सम कामांसाठी तब्बल १४ लाख ४८ हजार, स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंच्या आठ दिवसांचे भोजन आणि नाश्त्यासाठी १७ लाख ६० हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच खेळाडूंची आमदार निवासात राहण्याची सोय करण्यात आली असून यासाठी दोन लाख ८८ हजार, तेथील बिछायतीसाठी  २ लाख ५६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पंचांना मानधन म्हणून २ लाख ७० हजार तर दोन तासांच्या उद्घाटन व समारोपाच्या कार्यक्रमासाठी १ लाख खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पध्रेच्या पत्रकार परिषदेवर आधीच एक लाखाचा खर्च करण्यात आला आहे.

एकीकडे महापालिका आर्थिक टंचाईला तोंड देत असताना कमी खर्चात ही स्पर्धा घेण्याचे सोडून उलट ती आणखी महागडी करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. या वाढीव खर्चासोबतच निविदा न काढण्याचा प्रस्ताव संशयास्पद ठरणारा आहे. विशेष म्हणजे, महापौर या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ आहेत.

महापौर चषक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पध्रेसंदर्भात मला काही माहीत नाही. स्पध्रेच्या खर्चासंदर्भातील विषय आधी स्थायी समितीकडे जाईल नंतर माझ्याकडे येईल. तेव्हाच मी काही सांगू शकेल. तसेच पूरग्रस्तांना मदतीसंदर्भात शासनाकडून कोणतेच आदेश महापालिकेला आले नाहीत. आदेश येताच अधिकारी- कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार त्यांच्या संमतीने देण्यात येईल.   – नंदा जिचकार, महापौर