तुकडे विहिरीत ; अनेक महिन्यांपासून वन खात्यातील महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त
विद्युत प्रवाह सोडून अस्वल आणि नीलगायीची शिकारच नव्हे, तर शिकारीनंतर त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून विहिरीत फेकण्याचा प्रकार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात उघडकीस आला. तब्बल दोन दिवसांनी शिकारीचा हा प्रकार व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या लक्षात आला. त्यामुळे पुन्हा हा व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक महिन्यांपासून या व्याघ्र प्रकल्पातील अनेक महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त आहेत.
नागझिऱ्यापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर तुमडीझराजवळ बोरुंडा येथे विद्युत प्रवाह सोडून अस्वल आणि निलगायीची शिकार करण्यात आली. एवढय़ावरच शिकारी थांबले नाहीत, तर प्रादेशिक नागझिऱ्याअंतर्गत येणाऱ्या एका शेतातील विहिरीत त्यांचे तुकडे करून टाकण्यात आले. अस्वलाची पूर्णपणे चिरफाड करण्यात आली होती आणि यकृत, कातडे आणि काही अवयव गायब होते. चिरफाड करून या अस्वलाला दगड बांधून, तर नीलगायीचेही तुकडे करून काही विहिरीत टाकण्यात आले होते. दोन दिवसांनी घटना उघडकीस आली तेव्हा वनखात्याकडून या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, घटनेच्या तपासाकरिता वनखाते श्वानपथक घेऊन फिरले तेव्हा ही घटना बाहेर कळली.
पहिल्यांदा मृत्यू नेमका कशाने झाला, ते लक्षातच आले नाही. दुसऱ्यांदा श्वानपथक गेले तेव्हा घटनेच्या ठिकाणी विद्युत तारा आढळल्या. शिकारीच्या ठिकाणापासून तर विहिरीपर्यंत अस्वल आणि निलगायीचे तुकडे कावडीत आणल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
नागझिऱ्याच्या उत्तर-पूर्व क्षेत्रात खाण्यासाठी वन्यप्राण्यांच्या मोठय़ा प्रकाणावर शिकारी केल्या जातात. अनेक मोठे पाटील, ठेकेदार एवढेच नव्हे, तर कर्मचारीही वन्यप्राण्यांच्या मांसाचे शौकिन आहेत. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी येथे होतच असतात. ही बाब वनखात्याला माहिती असूनही त्यांना पुराव्यासह पकडणे त्यांना जमलेले नाही. नीलगायीचे ज्याप्रमाणे तुकडे करण्यात आले त्यावरून खाण्यासाठीच त्याची शिकार केल्याचे स्पष्ट होते, तर अस्वल चुकून यात फसले असावे, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अस्वलाच्या कातडी आणि यकृताचा ताईत तयार करण्यासाठी वापर केला जातो.
या घटनेचा तपास नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कदम, वनपाल चन्ने करत आहेत.

अधिकाऱ्यांची वानवा
या व्याघ्र प्रकल्पात सध्या वनसंरक्षक, विभागीय वनाधिकाऱ्यांच्या प्रत्येकी एक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. सहाय्यक वनसंरक्षक पदावरही परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना बसवण्यात आले आहे. नवेगाव-नागझिऱ्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळून उणेपुरे एक वर्ष झालेले असतानाच या व्याघ्र प्रकल्पाला अधिकाऱ्यांची वानवा आहे.